
घरांचे प्रश्न मार्गी लावणारे ‘हाउसिंग मॅन’ राज्याला लाभले, मनीषा कायंदेंकडून एकनाथ शिंदें यांचे अभिनंदन
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आज विधान परिषदेत सिडकोच्या घरांच्या किंमतीत कपात करण्याची घोषणा केली. यानंतर आमदार कायंदे यांनी सभागृहात उपमुख्यमंत्री शिंदे यांचे अभिनंदन केले. मराठी माणूस मुंबई बाहेर जाऊ नये, हे केवळ गळा न काढता त्यावर ठोस योजना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आणली. अनेक वर्षांपासून रखडलेला फनेल झोनचा विषय, संरक्षण खात्याशी निगडीत विषयाचे गांभीर्य लक्षात घेत त्यावर सर्वसमावेशक तोडगा काढण्याचे काम उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केले. ज्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांना मेट्रो मॅन म्हणून ओळखले जाते तसेच आता घरांचे प्रश्न सोडवणारे एकनाथ शिंदे हे ‘हाउसिंग मॅन ऑफ महाराष्ट्र’ आहेत. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सामान्यांच्या घरांच्या प्रश्नांविषयी न भूतो न भविष्यति असे ऐतिहासिक निर्णय घेतले, असे असे त्या म्हणाल्या. एकामागून एक घेतलेल्या धडाकेबाज निर्णयांमुळे राज्यात अनेक वर्षांनंतर सर्वसमावेशक गृहनिर्माणाचे धोरण अंमलात येणार आहे, असे आमदार कायंदे म्हणाल्या.
हिवाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मुंबई शहराला पागडीमुक्त करण्यासाठी तसेच पागडी इमारतींचा सुयोग्य व न्याय पुनर्विकास करण्यासाठी स्वतंत्र नियमावली करण्याची ऐतिहासिक घोषणा केली होती. मुंबईत १९ हजारांपेक्षा पेक्षा जास्त सेस इमारती किंवा पागडी इमारती आहेत. तसेच मुंबईतील फनेल झोनमुळे रखडलेल्या इमारतींच्या पुनर्विकासाला गती देण्यासाठी नवीन योजनेचीही घोषणा करण्यात आली. त्याचबरोबर ५० एकर किंवा त्यापेक्षा मोठ्या खाजगी, शासकीय किंवा निमशासकीय जमिनींवर एकत्रितपणे झोपडपट्टी पुनर्विकास योजना जाहीर केली. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात मुंबईतील १७ प्रमुख ठिकाणांची निवड करण्यात आली आहे. या निर्णयामुळे मुंबईतील लाखो झोपडपट्टीवासीयांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच उपमुख्यमंत्री शिंदे यांनी विधान परिषदेत नवी मुंबईतील सिडकोच्या आगामी लॉटरीमधील वेगवेगळ्या प्रवर्गातील घरांसाठीच्या किंमतीत १० टक्के कपात करण्याची घोषणा केली. या निर्णयामुळे आता ही घरे पूर्वीपेक्षा स्वस्त दरात उपलब्ध होणार असून नवी मुंबई परिसरात घर घेण्याचे सर्वसामान्यांचे स्वप्न आता अधिक सुकर होणार आहे.