फोटो सौजन्य - Social Media
नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागातील गावे, वाडी आणि पाड्यांना पारंपरिक पद्धतीने वीजपुरवठा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. आतापर्यंत या भागांमध्ये अपारंपरिक पद्धतीने वीजपुरवठा केला जात होता. विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली. अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यातील अनेक गावे आणि वाड्यांना अद्यापही पूर्णतः वीज मिळालेली नाही. यासंदर्भात सदस्य आमश्या पाडवी यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, नंदुरबार जिल्ह्यातील अपारंपरिक वीजपुरवठा होत असलेल्या ३१ गावे व ८५ वाडी-पाडे (धडगाव तालुका) आणि ५ गावे व २३० वाडी-पाडे (अक्कलकुवा तालुका) यांना लवकरच पारंपरिक वीज जोडणी दिली जाईल.
त्याचबरोबर, नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागात वीजप्रणाली मजबूत करण्यासाठी व्यापक पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. सध्या अक्कलकुवा तालुक्यातील १८५ गावे आणि ७४९ वाडी-पाडे तसेच धडगाव तालुक्यातील १३१ गावे आणि ९१६ वाडी-पाडे पारंपरिक वीजप्रणालीद्वारे जोडण्यात आले आहेत. उर्वरित भागांमध्ये लवकरच वीज जोडणी केली जाईल. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागात पारंपरिक वीज पोहोचवण्यासाठी राज्य शासनाने प्रस्ताव सादर केला आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र शासनाच्या ‘प्रधानमंत्री जन मन योजना’ अंतर्गत निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्यामुळे वीज जोडणीचा वेग वाढेल आणि दुर्गम भागातील लोकांना अखंडित वीज मिळू शकेल.
नंदुरबार जिल्ह्यातील अनेक दुर्गम आणि आदिवासी भागांमध्ये अद्यापही पारंपरिक वीज उपलब्ध नाही, त्यामुळे येथील नागरिक, शेतकरी आणि विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. राज्य शासनाने ही परिस्थिती लक्षात घेऊन पुढील दीड ते दोन वर्षांत सर्व गावे, वाड्या आणि पाड्यांना पारंपरिक वीजपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयामुळे नागरिकांना अखंडित वीज मिळेल, शेती आणि लघुउद्योगांना चालना मिळेल, तसेच विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अधिक चांगल्या सुविधा मिळतील. वीजवाहिन्या विस्तार, नवीन ट्रान्सफॉर्मर आणि उपकेंद्रे बसवण्याचे काम वेगाने करण्यात येणार असून, संबंधित विभागांना तातडीने अंमलबजावणीचे निर्देश देण्यात आले आहेत. हा निर्णय ग्रामीण भागाच्या विकासासाठी मोठे पाऊल ठरणार आहे.