सातारा : सध्या राज्यामध्ये माकड चाळ्यांना उत आला आहे. माझा फेव्हरेट कार्टून शो टॉम अँड जेरी सोडून मी या माकड चाळ्यांचा आनंद घेत आहे. जी ईडी (Enforcement Directorate) कोणाला माहीत नव्हती. त्याचा वापर सातत्याने होत आहे. त्यामुळे ईडीची अवस्था पानपट्टीवरच्या बिडीसारखी झाली आहे, असा घणाघात खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी सातार्यात केला.
एका खाजगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत उदयनराजे भोसले यांनी आपली सडेतोड मते व्यक्त करत या विधानात जणू भाजपला घरचा आहेर दिला. राज्यातील दिवसेंदिवस वादग्रस्त बदलत चाललेली राजकीय परिस्थिती महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यातील सुरु असलेले आरोप प्रत्यारोप या विषयावर पत्रकारांनी उदयनराजेंना बोलते करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा उदयनराजे नेहमीप्रमाणे रोखठोक शैलीमध्ये व्यक्त झाले.
ते पुढे म्हणाले, माझ्या हातात ईडी द्या. म्हणजे मी दाखवतो सगळ्यांना. ईडी म्हणजे हा चेष्टेचा विषय झाला आहे. कोणी कोणावर सूड काढायचा राग व्यक्त करायचा आणि ईडीची भाषा बोलायची हे योग्य नाही. ईडी म्हणजे पानपट्टीवरील बिडी मिळतेना अशी त्याची अवस्था झाली. आरोप-प्रत्यारोप करणाऱ्यांना सरळ ताब्यात घ्या आणि चाप लावावा म्हणजे सगळे सरळ होतील, अशांना दांडक्याने सडकून काढले पाहिजे, असा थेट घणाघात उदयनराजे भोसले यांनी केला.