मुंबईमध्ये ईडीचे १२ ठिकाणे छापे
मुंबई : बेकायदेशीर आर्थिक व्यवहारासंबंधित कारवाई करणारी संस्था ईडी अर्थात अंमलबजावणी संचालनालयाने मुंबईत कारवाईचा धडाका सुरु केला आहे. वसई-विरारमधील 41 अनधिकृत इमारतींशी संबंधित एका मोठ्या घोटाळ्याच्या चौकशीसंदर्भात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मंगळवारी सकाळपासून वास्तुविशारद आणि नगर अभियंत्यांच्या ठिकाणी छापे टाकण्यास सुरुवात केली.
वसई, विरार आणि मुंबईतील 12 ठिकाणी ही कारवाई सुरू आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. तपासाचे केंद्रबिंदू नालासोपारा पूर्वेतील अग्रवाल नगरी येथे बांधलेल्या 41 अनधिकृत इमारती आहेत. ज्यांच्या बांधकामात भ्रष्टाचार आणि आर्थिक अनियमिततेचे आरोप आहेत. यापूर्वी, १४ मे २०२५ रोजी ईडीने वसई-विरार महानगरपालिकेचे माजी नगररचना संचालक वाय. एस. रेड्डी यांच्या हैदराबाद निवासस्थानावर आणि वसई-विरारमधील १३ ठिकाणी छापे टाकले होते.
हेदेखील वाचा : रॅगिंगवर UGC ची मोठी कारवाई! IIT, IIM आणि AIIMS ला देखील बजावली कारणे दाखवा नोटीस
या दरम्यान, रेडी यांच्या घरातून ३२ कोटी रुपयांची रोकड आणि सोने जप्त करण्यात आले होते. ईडीच्या तपासात रेड्डी यांनी अनधिकृत बांधकामांना मंजुरी देण्यासाठी त्यांच्या पदाचा गैरवापर केला आणि बेहिशेबी संपत्ती मिळवली, असे आढळून आले. या माहितीच्या आधारे, ईडीने आता नगररचना विभागाच्या आर्किटेक्ट आणि अभियंत्यांवर कारवाई तीव्र केली आहे.
रोख रकमेऐवजी सोन्याचा वापर
या अनधिकृत इमारतींना परवाने देण्यासाठी आर्किटेक्ट्समार्फत मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार करण्यात आल्याचा आरोप आहे. ज्यामध्ये रोख रकमेऐवजी सोने वापरले गेले. रेड्डी यांच्यावरील कारवाईनंतर अनेक आर्किटेक्ट्स परदेशात पळून गेले, परंतु प्रकरण शांत झाले आहे असे गृहीत धरून ते परतले. तथापि, ईडीच्या ताज्या कारवाईमुळे त्या सर्वांना पुन्हा चौकशीच्या कक्षेत आणले आहे. त्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.
अभिनेता डिनो मोरियाला समन्स
ईडीकडून वेळोवेळी अशाप्रकारे कायदेशीर कारवाई केली जाते. त्यातच काही दिवसांपूर्वीच मिठी नदी स्वच्छता घोटाळा प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने बॉलिवूड अभिनेता डिनो मोरियाला समन्स बजावले होते. या प्रकरणी तपास यंत्रणेने चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देशही दिले आहेत. ईडीने यापूर्वीही डिनो मोरियाची चौकशी केली होती, परंतु काही महत्त्वाच्या माहितीची चौकशी करण्यासाठी त्याला पुन्हा बोलावण्यात आले.
हेदेखील वाचा : Shaktipeeth Expressway: “जीव गेला तरी….”; शक्तीपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरात चक्काजाम आंदोलन