शक्तिपीठ महामार्गाला विरोध वाढला
कोल्हापूर: जमिनी आमच्या हक्काच्या नाही कुणाच्या बापाच्या…देत नाही देत नाही जीव गेला तरी देणार नाही .अशी आरोळी करत महायुती सरकारच्या विरोधात बोंब मारत आज नागपूर गोवा शक्तिपीठ महामार्ग रद्द व्हावा या मागणीसाठी आज कोल्हापुर येथील पंचगंगा नदी पुलावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले .या आंदोलनाचे नेतृत्व माजी खासदार राजू शेट्टी ,माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी केले. सुमारे दोन तास या चक्काजाम आंदोलनामुळे महामार्गावर वाहतूक ठप्प झाली होती. महामार्गावर मोठा कडेकोट पोलीस बंदोबस्त असतानाही एका शेतकऱ्यांने थेट पंचगंगा फुलावरून नदीत उडी मारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे वातावरण काही काळ तणावपूर्ण झाले आंदोलनानंतर पोलिसांनी विजयी देवणे, राजू शेट्टी यांच्यासह महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या नेत्यांना ताब्यात घेतले नंतर त्यांना सोडून देण्यात आले.
काल रात्री संघर्ष समितीच्या नेत्यांना पोलिसांनी नोटिसा बजावून आंदोलन करू नये असा इशारा दिला होता. मात्र पोलिसांची नोटीस धुडकावून आज हे नेते रस्त्यावर उतरले होते. शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेला हा शक्तीपीठ महामार्ग यामध्ये हजारो हेक्टर सुपीक शेती जमिनी नष्ट होणार आहेत. शेतकऱ्यांनी या विरोधात आवाज उठवून आंदोलनाचे हत्यार उपसून विधानसभा निवडणुकीवेळी हा वादग्रस्त महामार्ग रद्द करण्याची घोषणा त्या वेळच्या सरकारने केली होती. पण राज्यात पुन्हा सरकार येताच हा शक्तीपीठ महामार्ग रेटण्याचा प्रयत्न होऊ लागला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या शक्तीपीठ महामार्ग विरोधात शेतकऱ्यांनी आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे .
Shaktipeeth Expressway: “… तर आमची रक्त सांडायची तयारी आहे”; शक्तीपीठविरुद्ध शेतकरी आक्रमक
कोल्हापूर बरोबरच महाराष्ट्रात बारा जिल्ह्यातील शेतकरी तसेच शेतकरी संघटना विविध राजकीय पक्ष एकत्र येत प्रकल्प विरोधात आवाज उठवत आहेत. वाढत्या असंतोष च्या पार्श्वभूमीवर आज पुणे बेंगलोर महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली या आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. यावेळी माजी आमदार ऋतुराज पाटील, शिवसेनेचे सह संपर्क नेते विजय देवणे यांच्यासह हजारो शेतकरी उपस्थित झाले होते. आजच्या या आंदोलनात व्ही. बी. पाटील, राजू लाटकर, आर. के. पवार, सचिन चव्हाण ,सतीशचंद्र कांबळे ,प्रकाश पाटील, शिवाजी मगदूम ,विक्रांत पाटील ,दिलीप पवार, संदीप देसाई ,बाबासाहेब देवकर ,चंद्रकांत यादव ,रघुनाथ कांबळे ,अतुल दिघे ,अजित पवार, सागर कोंडेकर, बाबुराव कदम ,शशिकांत खवरे ,सुयोग वाडकर, सुभाष देसाई, आदींच्यासह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.