सातारा : कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये कोणतीही दैवी प्रतिमा भाजपला वाचवू शकत नाही. ऑपरेशन लोटस प्रमाणे भाजपला हद्दपार करण्याचे मिशन तेथील जनतेने हाती घेतले आहे. त्यामुळे भाजपला बजरंगबली सुद्धा वाचवू शकणार नाही अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी साताऱ्यात केली.
येथील काँग्रेस कमिटीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव यांच्या हस्ते पटोले यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला त्यानंतर पटोले यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
ते पुढे म्हणाले लोकशाहीला न जुमानता भाजप एखाद्या मिशनला लोटस मिशन असे नाव देते हे अत्यंत चुकीचे आहे. आता कर्नाटकमधून भाजप परत जा असे मिशन तेथील जनतेने राबवले आहे त्यामुळे भाजपला कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत बजरंग बली सुद्धा वाचवू शकणार नाहीत कारण बजरंग बली हे पूर्णपणे काँग्रेसच्या बाजूने आहेत. कर्नाटकमध्ये बजरंग बलीची मंदिरे बांधण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाने घेतलेला आहे. मणीपूरमध्ये आगीचा डोंब उसळलेला असताना भाजपचे देश पातळीवरील आणि राज्य पातळीवर नेते कर्नाटक निवडणुकीत प्रचारासाठी उतरले आहेत हे जनतेला पटलेले नाही. मुळात मी आज कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या समाधीचे आणि विचारांचे दर्शन घेण्यासाठी आलो आहे हाच विचार घेऊन मी पुढे संपूर्ण महाराष्ट्रात जाणार आहे. मात्र कमवा शिका आणि राज्यातील बहुजन समाजाला शिक्षण देण्याचे सूत्र कर्मवीरांनी राबवले होते याच विचारांना तिलांजली देण्याचे काम सध्याच्या केंद्र सरकारने राज्य सरकारकडून सुरू आहे. भविष्यात ज्यांच्याकडे पैसा आहे अशाच मुलांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध होतील अशी व्यवस्था निर्माण करण्याचे काम केले जात आहे. जागोजागी पैसेवाल्या लोकांच्या अकॅडमी पाहायला मिळत आहेत तिथे फक्त श्रीमंतांची मुले शिक्षण घेऊ शकतात त्यामुळे महाराष्ट्रात कर्मवीरांचे विचार पुसून टाकण्याचे काम सुरू झाले आहे.
कर्नाटक निवडणुकीत सध्या तेथील काही संघटनांनी भाग घेतला आहे या निवडणुकीत बाहेरून प्रचार करण्यासाठी कोणीही येऊ नये अशी त्यांची मानसिकता असतानाही त्या ठिकाणी प्रचाराला गेल्यामुळे काही जणांना रोशाला बळी पडावे लागले तरी काही संघटनांचा राग मात्र पूर्णपणे भाजप विरोधी आहे सत्तेसाठी काही पण अशी कायम भूमिका घेणाऱ्या भाजप नेहमीच सत्तेसाठी दुटप्पी धोरण ठेवले आहे त्यामुळे कर्नाटक मधील जनतेने आता भाजपने परत जावे अशी मोहीम हातात घेतली आहे भाजपला तिथे कोणीही वाचवू शकत नाही.
राज्य पातळीवरील मुद्द्यावर बोलताना ते म्हणाले आगामी निवडणुकीत भाजप विरोधी लढण्याची धारिष्ट जे जे पक्ष दाखवतील अशा समविचारी पक्षांना घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत. याच महिन्यात जागा वाटपा संदर्भात शिवसेना, राष्ट्रवादी आणि सम विचारी पक्षांशी चर्चा केली जाणार आहे. महाविकास आघाडीमध्ये काही धुसफूस आहे का असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले महाविकास आघाडीत नव्हे तर जनतेच्या मनात खदखद आहे. गेल्या सात महिन्यात प्रचंड महागाई बेरोजगारी आणि अवकाळी पावसामुळे झालेले शेतकऱ्यांचे नुकसान याविषयी प्रचंड असंतोष आहे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे हे मुद्दे मांडायचे नाहीत का? मी आरोप करतो असे म्हटले जाते मात्र जी वास्तविकता घडलेली आहे त्याचीच मी मांडणी करत आहे. काँग्रेस पक्षाची बांधिलकी ही फक्त जनतेच्या प्रश्नांची आहे आमच्यावर कोण काय टीका करतो याकडे आम्हाला लक्ष देण्याची गरज नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यशैलीवर टीका करताना ते म्हणाले लोकशाहीची व्यवस्था व संविधानाचा वापर योग्य हवा असे आमचे मत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांना मदत देतो असे जाहीर केले होते ती मदत शेतकऱ्यांना मिळाली का? हा सुद्धा एक प्रश्न आहे. आजच्या महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारी प्रचंड वाढली आहे गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावर महिला बेपत्ता झाल्या आहेत. ही आकडेवारी सध्याची पंतप्रधान व केंद्रीय गृहमंत्री यांच्यासाठी चिंतेची आहे ते आया बहिणींची रक्षा करू शकले नाहीत आज महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखे मुख्यमंत्री होऊन गेले दोन्ही चव्हाण यांचा बाणा या मुख्यमंत्र्यांमध्ये दिसत नाही अशी टीका यांनी केली.
कोकणातील बारसू प्रकल्पाबाबत बोलताना ते म्हणाले जनतेचे मत घेऊन त्या ठिकाणी रिफायनरी करावी कोकणातील वनसंपदा संपवून त्या ठिकाणी कोणताही प्रकल्प असू नये अशी त्यांची भूमिका आहे मात्र संबंधित आंदोलकांवर तेथे लाठी चार्ज होतो हे अत्यंत लाजिरवाणे असल्याचे त्यांनी सांगितले पुणे येथील डीआरडीओ चे शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर यांनी पाकिस्तानला पुरवलेल्या गोपनीय माहिती बाबत बोलताना ते म्हणाले ज्या व्यक्ती देशाच्या सार्वभौमत्वाशी तडजोड करतात अशा लोकांशी निश्चित कारवाई झाली पाहिजे. सातारा शहर परिसरातील संगम माहुली राजघाट येथील छत्रपती शाहू महाराज आणि महाराणी येसूबाई यांच्या समाधीचे दर्शन नाना पटोले यांनी घेतले येथील समाधी परिसराची अवस्था बिकट असून त्याच्या जिर्णोद्धाराचा उपक्रम काँग्रेसच्या वतीने हाती घेणार येणार आहे असे ते म्हणाले.