राजकारणात मला फक्त आशिष शेलार माहिती; ठाकरे बंधूंवरील प्रश्नावर आशा भोसलेंचं उत्तर
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या भाषेचा विषय चांगलाच गाजत आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रमुख उद्धव ठाकरे यांचा एकत्रित मोर्चा येत्या ५ जुलै रोजी निघणार आहे. राज्य सरकारच्या हिंदी सक्तीविरोधातील आंदोलनात दोघंही एकाच व्यासपीठावर दिसणार आहेत. ही साथ केवळ मोर्चापुरती असेल की भविष्यातील राजकीय युतीचे संकेत, यावर तर्कवितर्क सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
आर. डी. बर्मन यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात माध्यमांशी संवाद साधताना आशा भोसलेंना या राजकीय घडामोडीबद्दल विचारण्यात आलं. ठाकरे आणि मंगेशकर कुटुंबीयांमधील मैत्रीपूर्ण संबंध सर्वश्रुत असल्याने उपस्थित पत्रकारांनी त्यांचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, आशा भोसले यांनी “मला राजकारणातले फक्त आशिष शेलार माहिती आहेत. इतर कोणी माहिती नाही. मला राजकारण अजिबात नकोच आहे.”, असा शब्दात त्यांनी उत्तर दिलं.
राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याची चर्चा केवळ मोर्च्यापुरती मर्यादित नसून, त्या पलीकडची राजकीय शक्यता अनेकांच्या चर्चेचा विषय बनली आहे. उद्धव ठाकरे यांनी शिवसेना वर्धापन दिनी दिलेलं “जे महाराष्ट्राच्या मनात आहे, तेच होईल” हे विधान आणि राज ठाकरे यांचं “५ जुलैला सगळं स्पष्ट होईल” असं वक्तव्य, या चर्चा आणखी गडद करत आहेत.
Thackeray Brothers Alliance: राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन, राजकीय घडामोडींना वेग; नेमकं घडलं काय?
या संभाव्य एकीबद्दल शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले, “राज आणि उद्धव ठाकरे हे मनाने आधीच एकत्र आले आहेत.” तर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मोर्चाच्या भूमिकेवर जोर दिला. “या सरकारने महाराष्ट्रावर हिंदी भाषा लादू नये. मराठी भाषेची गळचेपी थांबवण्यासाठी एकत्रितपणे उभं राहणं गरजेचं आहे,” असं ते म्हणाले. राज ठाकरे यांनी मोठा मोर्चा काढण्याचं आवाहन केलं असून, मनसेसह शिवसेनाही त्यासाठी सज्ज असल्याचं स्पष्ट झालं आहे. ५ जुलै रोजी होणारा हा मोर्चा केवळ भाषेच्या मुद्द्यावर आधारित आंदोलन न राहता, भविष्यातील नव्या राजकीय समीकरणांची नांदी ठरू शकतो का? याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.