ठाकरे बंधुंचा मोर्चा मराठीसाठी नाही, महापालिका निवडणुकांसाठी; शिंदे गटाच्या आमदाराचा दावा
राज्य सरकारने शाळांमध्ये पहिली ते चौथीपर्यंत हिंदी भाषा तिसऱ्या भाषेच्या रूपात शिकवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला राज्यातून विरोध वाढत असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात एकत्रितपणे मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईत ५ जुलै रोजी होणाऱ्या या मोर्चात मराठी जनतेने मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात येत आहे. मात्र ठाकरे बंधुंचा हा मोर्चा भाषेसाठी नाही तर आगामी महापालिका निवडणुकांसाठी असल्याची टीका शिंदे गटाच्या आमदाराने केली आहे.
BJP State President: मोठी बातमी! महाराष्ट्र भाजपला लवकरच मिळणार नवा प्रदेशाध्यक्ष; दोन नावे आघाडीवर
शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील म्हणाले की, “मराठीसाठी नव्हे, तर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोघं एकत्र आले आहेत,” असा दावा करत त्यांनी या मोर्चाच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. ठाकरे बंधू केवळ राजकीय स्वार्थातून आणि आगामी निवडणुकांच्या तयारीसाठी हे आंदोलन करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, या मोर्चावर काँग्रेसकडूनही भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले की, “हिंदीची सक्ती आम्हालाही मान्य नाही. जर राज आणि उद्धव ठाकरे कोणत्याही पक्षाच्या झेंड्याशिवाय, केवळ मराठीच्या मुद्यावर मोर्चा काढत असतील आणि आमंत्रण दिलं गेलं, तर आम्ही सकारात्मक विचार करू.” त्यांनी हेही नमूद केलं की मनसेचे बाळा नांदगावकर आणि राज ठाकरे यांनी मोर्चात सहभागी होण्यासाठी संपर्क साधल्याचं म्हटलं आहे.
“राज्यात मराठी सक्तीचीच आहे. हिंदी ही पर्यायी ऐच्छिक भाषा आहे. भाजप नेहमीच मराठीसाठी कठोर भूमिका घेत आलेला आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यात भाजप आणि केंद्र सरकारचा मोठा वाटा आहे. काहीजण गैरसमज पसरवत आहेत, पण सत्य समोर येणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे मुंबई अध्यक्ष आणि मंत्री आशिष शेलार यांनी दिली आहे. दरम्यान राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्रित आंदोलनावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं असून खरंच हे आंदोलन मराठीसाठी आहे की राजकीय फायद्यासाठी हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.