
कांद्याचे दर घसरल्यामुळे सरकार विरोधात संताप; शिरूरमधील शेतकऱ्यांचे नवी दिल्लीत अर्धनग्न आंदोलन
पुणे : कांद्याच्या दरात झालेल्या तीव्र घसरणीचा आणि केंद्र सरकारच्या निर्यातबंदी धोरणाचा निषेध करून पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी गुरुवारी (दि.२२)नवी दिल्ली येथील कृषी मंत्रालयासमोर भाऊबीजेच्या दिवशी अर्धनग्न आंदोलन केले. या आंदोलनात सागर फराटे, विजय साळुंके, परशुराम मचाले आणि नवनाथ फराटे या शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. शेतकऱ्यांनी अर्धनग्न अवस्थेत गळ्यात कांद्याच्या माळा आणि खांद्यावर कांद्याच्या पोती टांगून सरकारविरोधात घोषणा दिल्या. “सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे आम्ही आर्थिकदृष्ट्या नग्न झालो आहोत” असे सांगून शेतकऱ्यांनी दिल्लीच्या रस्त्यावर केंद्र सरकारचा जाहीर निषेध नोंदविला.
चर्चा करून सकारात्मक भूमिका घेऊ
कृषी मंत्रालयाच्या प्रवेशद्वारासमोर झालेल्या या आंदोलनावेळी मंत्रालयाचे संयुक्त सचिव अन्बलगन पी यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांवर चर्चा करून सकारात्मक भूमिका घेण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर शेतकऱ्यांनी वाणिज्य मंत्रालयाकडे निवेदन देण्याचा प्रयत्न केला असता, दिल्ली पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन संसद भवन कर्तव्य पथ पोलिस ठाण्यात नेले. काही वेळानंतर पोलिसांनी शेतकऱ्यांना सोडून दिले. दरम्यान, सागर फराटे यांना प्रधानमंत्री कार्यालयात जाऊन मागण्यांचे निवेदन सादर करण्याची परवानगी देण्यात आली. संध्याकाळपर्यंत सर्व शेतकऱ्यांची चौकशी पूर्ण करून त्यांची मुक्तता करण्यात आली.
निर्याती संदर्भातील धोरणात तात्काळ बदल करा
शेतकऱ्यांनी कांद्याच्या निर्याती संदर्भातील धोरणात तात्काळ बदल करण्याची, कांद्याला किमान हमीभाव देण्याची आणि निर्यातबंदीमुळे झालेल्या आर्थिक नुकसानीची भरपाई तात्काळ करण्याची मागणी केली आहे. आंदोलनाच्या प्रतीकात्मक स्वरूपात शेतकऱ्यांनी कांद्याच्या माळा व पोती परिधान करून “आम्ही देशाला अन्न देतो, पण सरकारच्या निर्णयांमुळे उपाशी आणि नग्न झालो आहोत” असा संतप्त स्वर व्यक्त केला.
पुणे जिल्ह्यात व्यापक स्वरूप घेणार
कृषी मंत्रालयाकडून शेतकऱ्यांच्या निवेदनावर गंभीर विचार करण्यात येईल, असे आश्वासन मिळाले असले तरी शेतकऱ्यांनी स्पष्ट केले की, लवकरात लवकर निर्णय न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र केले जाईल. शिरूरसह राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये या आंदोलनानंतर संतापाची लाट उसळली असून, पुढील काही दिवसांत हे आंदोलन पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर व्यापक स्वरूप घेणार असल्याचा विश्वास शिरूर तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.