Farmers protest strongly in Sangli to oppose Shakti Peeth Highway
सांगली : शक्तिपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे, या मागणीसाठी शेतकरी कामगार पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. लाल झेंड्याखाली नागपूर गोवा शक्तिपीठ महामार्ग -बाधित शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने रविवारी आंदोलन करण्यात आले. यामध्ये शक्तीपीठ महामार्गाच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फासावर लटकवून आंदोलन केले. यावेळी शेतकऱ्यांनी सरकार विरोधात आक्रमक भूमिका घेत शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी केली.
कवलापूर येथे बाधित शेतकरी व महिला यांनी द्राक्षबागा, ऊसशेती उद्ध्वस्त करून बेरोजगार, भूमिहीन करणारा शक्तिपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे, यासाठी शेतकरी एकजुटीचा विजय असो, जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, शक्तिपीठ महामार्ग लादणाऱ्या सरकारचं करायचं काय, खाली डोकं वर पाय… या व इतर जोरदार घोषणा देऊन निषेध केला. तसेच राज्य सरकारने शक्तिपीठ महामार्ग लादलेल्या धोरणाच्या व शेतकऱ्यांवर आलेल्या संकटाच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फाशी देण्यात आली.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
शहीद भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना अभिवादन करण्यात आले. छत्रपतींचा भगवा झेंडा वावरात रोवून शासनाला इशारा देण्यात आला. महामार्ग करण्याअगोदर आमच्या वावरातील आमची अस्मिता, आमचा प्राण असणारा छत्रपतींचा भगवा झेंडा वावरातून काढून दाखवावा. झेंडा काढणे म्हणजे आमचा प्राण घेणे. आम्ही जिवंत असेपर्यंत शक्तिपीठ महामार्गासाठी एकही इंच जमीन देणार नसल्याचा निर्धार यावेळी सर्व बाधित शेतकऱ्यांनी केला.
जिल्हाभरात बुधगाव, मणेराजुरी, गव्हाण, डोंगरसोनी, घाटनांद्रे, नागाव कवठे, तिसंगी या व इतर बाधित गावांमध्ये छत्रपतींचा भगवा झेंडा वावरात लावून शासनाच्या विरोधात घोषणा देऊन अतितीव्र निषेध व्यक्त केला.
यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे नेते विनोद लगारे, श्रमिक संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब यादव यांनी लढ्याला पाठिंबा देऊन मार्गदर्शन केले. यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे नेते व नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गबाधित शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष दिगंबर कांबळे, शरद पवार गव्हाण, घनःश्याम नलावडे, भूषण गुरव, प्रवीण पाटील, अधिक पाटील, विष्णू सावंत, राहुल जमदाडे, गजानन सावंत, हणमंत सावंत, प्रकाश टकले, शेरखान पठाण, गजानन सावंत, शिवाजी शिंदे, दत्तात्रय बेडगे, सिध्देश्वर जमदाडे, गजानन पाटील, राधिका नलावडे आदी उपस्थित होते.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांनी देखील यापूर्वी शक्तीपीठी महामार्गाविरोधात भूमिका घेतली. यावेळी त्यांनी सरकारवर गंभीर आरोप केला आहे. राजू शेट्टी म्हणाले होते की, शक्तिपीठ महामार्ग हा भाविकांसाठी व विकासासाठी नसून सत्तेतील राजकीय नेत्यांच्या व प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या फायद्यासाठी असल्याचा आरोप करून शेट्टी म्हणाले, ज्या महामार्गासाठी तीस ते पस्तीस हजार कोटींचा खर्च होतो, तो खर्च या महामार्गासाठी ८६ हजार कोटी होणार आहे. यामध्ये प्रत्येक आमदाराचा दर ५० कोटींचा राहणार आहे. त्यामुळे आपला या महामार्गाला विरोध असणार आहे. शक्तिपीठ महामार्गात ५० हजार कोटींचा घोटाळा होणार असल्याचा गंभीर आरोप शेट्टी यांनी केला आहे.