आता अतिवृष्टी पंचनामे पुन्हा सुरू
छत्रपती संभाजीनगर : अतिवृष्टी, पुरामुळे मराठवाड्यात 32 लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. पंचनाम्याचे काम 80 टक्के पूर्ण झाले आहे. मात्र, अतिवृष्टीमुळे पंचनामे करण्यात अडसर येत असल्याने ते थांबले होते. दरम्यान, आता पाऊस ओसरल्याने पंचनाम्यांना पुन्हा गती देण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी दिले आहेत. येत्या 5 ऑक्टोबरपर्यंत पंचनाम्यांचे काम पूर्ण करा, अशा सूचना त्यांनी यंत्रणेला केल्या आहेत.
जून ते ऑगस्टपर्यंतचे नुकसानीसाठीचा मदतनिधी मंजूर झाला असून, निधीचे डीबीटी प्रणालीद्वारे संबंधित बाधित शेतकऱ्यांना वाटप करण्यात येणार आहे. बाधित शेतकऱ्यांनी ई-केवायसी करुन घ्यावे, असे आवाहन विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून केले. अतिवृष्टी व पूर यामुळे मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पुरात अडकलेल्या लोकांना वेळेत मदत व्हावी, जीवितहानी होऊ नये, यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वय साधत कसोशीने प्रयत्न केले. हजारो लोकांना स्थलांतरीत करावे लागले. आता पाऊस थांबला असून, पचनाम्यांना पुन्हा गती देण्यात आल्याचे पापळकर म्हणाले.
विभागात 80 टक्के पंचनामे पूर्ण
विभागात 31 लाख 98 हजार हेक्टरवरील पिके बाधित झाली असून, पंचनामे जवळपास 80 टक्के पूर्ण झाले आहे. गेल्या तीन से चार दिवसात अतिवृष्टीमुळे पंचनाम्यांच्या कामाला काहीसा ब्रेक लागला होता. नुकसानीचे पंचनामे 5 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
थकीत कर्जाबाबत बँकांना अर्ज करा
शासनाकडून जून ते ऑगस्ट या कालावधीतील नुकसानीबाबत मागणीनुसार निधी प्राप्त झाला आहे. निधी डीबीटी प्रणालीद्वारे संबंधित बाधित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी याद्या प्रसिद्ध होताच त्वरित ई-केवायसी करून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. ही आपत्तीची मदत असल्याने बँकांनी शेतकऱ्यांच्या कर्जाचे पैसे यातून काढून घेऊ नये. काही बँकेत थेट कपातीबाबत यंत्रणा असते. त्यामुळे शेतकऱ्यांनीदेखील प्राप्त नुकसानभरपाई रक्केमतून कर्जाची रक्कम कपात करु नये, यासाठी बँकांना अर्ज करावे, असेही त्यांनी नमूद केले.
हेदेखील वाचा : Devendra Fadnavis: “अजूनही काही भागात पूरस्थिती, त्यामुळे…” मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय