मेढा : जावली तालुक्यातील सेतु सुविधा केंद्राचे महाऑन लाईन पोर्टल बंद असल्याने विद्यार्थ्यांची ससेहोलपट होत असून विविध प्रकारचे शेकडो दाखले रखडले आहेत. पालकांसह विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे. शैक्षाणिक व नोकर भरती साठी मुदतवाढ मिळावी अशी मागणी होताना दिसत आहे. दाखल्यांची कामे सुरुळीत होऊन विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी नविनच कार्यभार स्विकारलेले तहसिलदार हणमंत कोळेकर काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सध्या शाळा, कॉलेज, महाविद्यालय , विविध डिग्री कॉलेज यांची प्रवेश प्रक्रिया तसेच नोकर भरती सुरु असताना ऑनलाईन मिळणारे दाखले वेळेत मिळत नाहीत. उत्पन्न दाखला, नॅशनॅलिटी, रहिवाशी (डोमाशिअल), जातीचा दाखला, नॉन क्रिमिलअर दाखला आदी विविध प्रकारच्या दाखल्यांची शाळा प्रवेश आणि नोकरीनिमित्त गरज भासत असल्याने पालकांसह विद्यार्थ्यांची धडपड सुरू आहे.
दाखले मिळविण्यासाठी सकाळपासूनच गर्दी होत आहे. जावली तालुका हा भौगोलीक दृष्ट्या दऱ्या खोऱ्यांचा डोंगराळ तालुका आहे. त्यामुळे वेळेवर वाहणे मिळत नसल्याने लोक उपाशीपोटी तहसिल कार्यालयात सकाळपासूनच येत असतात. सायंकाळ पर्यत काम होईल, या आशेने थांबलेले पालक सायंकाळी नाराज होऊन दुसऱ्या दिवशी परत कार्यालयात हजर राहत असताना दिसत आहेत.
दि. १२ जून पासुन सेतु सुविधा केंद्राचे महाऑन लाईन पोर्टल बंद पडले असल्याचे लेबल चिकटवण्यात आले असल्याने पालकांची चिंता वाढली आहे. जलद गतीने प्रशासन चालावे, यासाठी ऑललाइन प्रणाली वापरली जात असताना ४५ दिवसांची मुदत दाखले मिळण्यासाठी मिळत असल्याने ऑनलाइन प्रणालीचा उपयोग काय? जर आर्थिक व्यवहार क्षणात होत असतील तर ऑनलाइन दाखल्यांना ४५ दिवस का लागतात हा संशोधनाचा विषय नाही काय? ज्यावेळी ऑनलाईन प्रणाली अंमलात नव्हती त्यावेळी हेच दाखले मिळविण्यासाठी ७ दिवस ते १५ दिवस मुदत असायची मग आता ऑनलाइन प्रणाली विकसित झाल्यानंतर २ दिवस ते ५ दिवस मुदत असणे गरजेचे आहे, अशी मागणी हाेत अाहे.
दाखले मिळण्यासाठी ४५ दिवस
मुळातच अर्ज दाखल करण्यासाठी तलाठ्याचे, ग्रामसेवकाचे दाखले गोळा करण्यासाठी १० ते १५ दिवस लागत असतील आणि ऑनलाइन दाखले मिळण्यासाठी ४५ दिवस लागत असतील म्हणजे दोन महिने दाखले मिळविण्यासाठी लागत असतील उपयाेग काय ? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
जनतेला नाहक त्रास
जिल्हाधिकाऱ्यांनी निव्वळ शासन आपल्या दारी योजना राबवून चालणार नाही तर चालणाऱ्या योजना जलद गतीने चालण्यासाठी प्रत्यत्न करणे गरजेचे आहे. जावली तालुक्यातील सेतु सुविधा केंद्राचे महाऑनलाइन पोर्टल बंद पडल्याने जनतेला नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. तो त्रास कमी करण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत.