
Finance Minister Nirmala Sitharaman, SIDBI, MSME development and rural industry modernization, MSME,
मुंबई २५ मे २०२५: देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज मुंबई येथे Small Industries Development Bank of India (SIDBI) च्या ३७ व्या स्थापना दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात विशेष सहभाग नोंदवला. यावेळी बोलताना सीतारमण यांनी लघू आणि मध्यम उद्योगांसाठी सिड्बीने केलेल्या कामाचा गौरव केला. यावेळी बोलताना सीतरमण यांनी MSME क्षेत्र भारताच्या विकासात, रोजगार निर्मितीत आणि निर्यात वाढविण्यात खूप महत्त्वाची भूमिका बजावत आहे असे म्हटले. याशिवाय त्यांनी पश्चिम आशियातील युद्धामुळे प्रभावित झालेल्या क्षेत्रांसाठी सरकारने आखलेल्या उपाययोजनांबद्दलही माहिती दिली. त्यामध्ये ECLGS 5.0 योजनेचा समावेश असून सध्याच्या कठीण काळात लघू आणि मध्यम उद्योगांना या योजनेचा मोठा फायदा होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच, SIDBI साठी सरकारने दिलेल्या ₹५००० कोटी भांडवल सहाय्याबद्दलही त्यांनी यावेळी आवर्जून उल्लेख केला. सीतारमण यांनी SIDBI ची “मार्केट-मेकर” म्हणून भूमिका यावेळी अधोरेखीत केली. या कार्यक्रमात MSME क्षेत्र मजबूत करण्यासाठी, शेवटच्या घटकांपर्यंत कर्ज पुरवठा आणि ग्रामीण उद्योगांचे आधुनिकीकरण करण्यासाठी काही नवीन उपक्रम आणि पोर्टल्स सुरू करण्यात आले.
या कार्यक्रमात SIDBI RRB Co-Lending Portal सुरू करण्यात आले. या पोर्टलद्वारे SIDBI आणि प्रादेशिक ग्रामीण बँका (RRBs) यांच्यात भागीदारी होऊन ग्रामीण आणि कमी सेवा मिळालेल्या भागात कर्जपुरवठा सुधारेल. तसेच SIDBI MachFin Mart हा डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आला. MSME उद्योगांना यंत्रसामुग्री खरेदीसाठी एक व्यवस्थित बाजारपेठ उपलब्ध करुन देणे तसेच कर्ज प्रक्रियाही सुलभ करणे हा या प्लॅटफॉर्मचा उद्देश आहे. (Modernisation of Rural Enterprises) हा उपक्रम पुढील ३ वर्षांत १०,००० ग्रामीण व हस्तकला उद्योगांना मदत करण्यासाठी सुरू करण्यात आला आहे. याशिवाय, सूक्ष्म उद्योगांसाठी ₹५ लाख मर्यादेचे क्रेडिट कार्डही सुरू करण्यात आले. त्यातून MSME क्षेत्रातील उद्योजकांना कामकाजासाठी आवश्यक भांडवल सहज आणि जलद मिळू शकेल.
संजय लोहिया, विशेष सचिव, वित्तीय सेवा विभाग यांनी सांगितले की, ” SIDBI ने आर्थिक क्षेत्रात विश्वासार्ह संस्था म्हणून स्थान निर्माण केले आहे आणि भविष्यातही MSME क्षेत्राला बळकटी देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल.”
मनोज मित्तल, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, SIDBI यांनी सांगितले की, “हे सर्व उपक्रम MSME कर्जपुरवठा अधिक सोपा, जलद आणि डिजिटल करण्यासाठी महत्त्वाचे आहेत. तसेच, ग्रामीण उद्योगांचे आधुनिकीकरण करून त्यांना अधिक स्पर्धात्मक, उत्पादक आणि भविष्यकालीन बनवणे हा SIDBI चा मुख्य उद्देश आहे.”