धावत्या शिवशाही बसला भीषण आग; बसचालकाला समजलं अन् लगेचच...
अमरावती : ‘सेंट्रल बँक ऑफ इंडिया’च्या चांदुर रेल्वे येथील शाखेत आग लागल्याची घटना घडली. ही घटना चांदूर रेल्वे येथे शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास घडली. आगीत बँकेतील संगणक, फर्निचरसह लाखोंची रोकड जळाल्याची माहिती आहे. अग्निशमन दलाने शर्थीचे करून ही आग नियंत्रणात आणली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला. आग लागल्यानंतर बँकेत एकच खळबळ उडाली होती. मात्र, सुदैवाने जीवितहानी झालेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, चांदुर रेल्वे येथील सेंट्रल बँकेच्या शाखेत शनिवारी नियमित कामकाज सुरू होते. दरम्यान, दुपारी बाराच्या सुमारास अचानक एका ठिकाणाहून धूर निघत असल्याचे दिसून आले. आग लागल्याचे दिसताच बँकेत पळापळ सुरु झाली. या आगीने काही क्षणातच रौद्ररुप धारण केले. त्यानंतर अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. चांदुर रेल्वे, तिवसा आणि धामणगाव रेल्वेतून अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. काही वेळातच आग नियंत्रणात आणली. आगीत बँकेतील संगणक, फर्निचरसह लाखोंची रोकड जळून खाक झाल्याचा अंदाज आहे.
आग लॉकरपर्यंत पोहोचली नाही, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. आग लागल्याची माहिती होताच नागरिकांनी बँकेकडे धाव घेतली. आग लागल्याचे समजताच बँकेचे कर्मचारी जीव वाचविण्यासाठी तसेच काम ठेवून बाहेर आले. यात जीवितहानी झालेली नसली तरी वित्तहानी मात्र मोठ्या प्रमाणावर झाल्याचे सांगितले जात आहे.