मधमाशांच्या थव्याने अचानक हल्ला केल्याने पाच जण जखमी
कुरुंदवाड : औरवाड (ता.शिरोळ) पुलावर मधमाशांच्या थव्याने अचानक हल्ला चढवला. या अचानक झालेल्या हल्ल्याने मोठी घबराट पसरली. या घटनेत पाच जण जखमी झाले असून, यामध्ये लहान मुलांचा समावेश आहे. तर एका महिलेची प्रकृती गंभीर असल्याने तिला तातडीने कुरुंदवाड येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सुजाता राजेंद्र शिरगावे (वय ४९ रा.औरवाड ता.शिरोळ) असे जखमी महिलेचे नाव आहेत. नृसिंहवाडी आणि औरवाड दरम्यान असलेल्या पुलावर काही नागरिक प्रवास करत होते. त्याचवेळी अचानक मोठ्या संख्येने मधमाशांनी हल्ला केला. काही नागरिकांनी पळून जाऊन बचाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाच जणांना मधमाशांनी चावा घेतला. या हल्ल्यात पुरुष आणि महिलांचा समावेश असून, एका महिलेची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे.
जखमींना रुग्णालयात करण्यात आलं दाखल
जखमी नागरिकांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात हलविण्यात आले. गंभीर जखमी महिलेवर कुरुंदवाड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. इतर जखमींवर प्राथमिक उपचार करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
पुलावरून जाणाऱ्या-येणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
या घटनेनंतर पुलावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिसरात अशा प्रकारच्या घटनांचे प्रमाण वाढत असल्याने स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे उपाययोजनांची मागणी केली आहे. पुलाजवळील झाडांवर मोठ्या प्रमाणात मधमाश्यांची पोळी असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
प्रशासनाने तातडीने द्यावे लक्ष
प्रशासनाने तातडीने तपासणी करून मधमाशांच्या त्रासावर नियंत्रण ठेवावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक ठिकाणी मधमाशांच्या हल्ल्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने मधमाशांच्या पोळ्यांचे निरीक्षण करून आवश्यक ती काळजी घेण्याची गरज आहे.