मुंबईतील 'या' पाच रेल्वे स्थानकांचं रुपडं आता पालटणार; पंतप्रधानांच्या हस्ते होणार उद्घाटन
मुंबई : अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत नवा साज चढलेल्या देशातील 125 स्थानकांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 17 किंवा 18 एप्रिल रोजी दिल्ली येथून उद्धघाटन होणार आहे. तसेच मध्य रेल्वेच्या लोकल विद्युतीकरणाला 100 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त देखील पंतप्रधानांच्या हस्ते विशेष उद्घाटन करण्यात येणार आहे. उद्घाटन करण्यात येणाऱ्या 125 अमृत भारत स्थानकांमध्ये मुंबईतील चिंचपोकळी, माटुंगा, परेल, शहाड, वडाळा या 5 स्थानकांचा समावेश आहे.
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील 15 रेल्वे स्थानकांचा कायापालट करण्यात येत आहे. यापैकी माटुंगा, शहाड आणि चिंचपोकळी स्थानकांची कामे पूर्ण झाली असून, 12 स्थानकांची कामे 80-85 टक्के पूर्ण झाली आहे. येत्या दोन ते तीन महिन्यात या रेल्वे स्थानकांची कामे पूर्ण होणार असून, पावसाळ्यापूर्वी स्थानकांना नवा साज चढणार आहे. मुंबईकरांना चांगल्या सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी स्थानकांमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. त्यासाठी रेल्वे मंत्रालयाने जाहीर केलेल्या ‘अमृत भारत’ योजना राबविली असून, केंद्रीय अर्थसंकल्पातून निधीची तरतूद केली आहे.
दरम्यान, अमृत भारत स्थानक योजनेंतर्गत स्थानकालगतच्या परिसरात सुधारणा करणे, सुशोभीकरण, प्रवेशद्वारांसाठी पोर्च तयार करणे, फलाटावर कव्हर टाकून उंची वाढविणे, दर्शनी भाग, सरकते जिने, लिफ्ट सुरू करणे आदी कामे होणार आहेत.
या स्थानकांची कामे पूर्ण
माटुंगा
काम सुरु असलेली स्थानके
भायखळा, कुर्ला, विद्या विहार, विक्रोळी, कांजूर मार्ग, दिवा, मुंब्रा, टिटवाळा, इगतपूरी, सँडहस्ट रोड
रेल्वे मंत्रायलयाकडून केला जातोय स्थानकांचा पुनर्विकास
अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत रेल्वे मंत्रालयाकडून स्थानकांचा पुनर्विकास केला जात आहे. त्यांचे एकूण बजेट 1 लाख कोटी रुपये आहे. 2023-24 मध्ये 8000 कोटी रुपये खर्च झाले आहेत आणि 2024-25 मध्ये 12993 कोटी रुपये खर्च होण्याची शक्यता आहे. यासोबतच 2025-26 च्या अर्थसंकल्पात पुनर्विकासासाठी 12000 कोटी रुपये देण्यात आले आहेत.