नांदेड – लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महाविकास आघाडी व महायुतीच्या नेत्यांचे दौरे आणि सभा वाढल्या आहेत. प्रचार सभेमधून एकमेकांवर जोरदार टीका केली जात आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान देखील पार पडले असून दुसऱ्या टप्प्यातील मतदान लवकरच पार पडणार आहे. त्यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. यावरुन उद्धव ठाकरे आक्रमक झाले आहेत.
घरात काम करणाऱ्यांना पण…
उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणामध्ये महायुतीच्या नेत्यांवर जहरी टीका केली आहे. भाषणामध्ये उद्धव ठाकरे यांनी पार्थ पवार यांना वाय दर्जाची सुरक्षा दिल्यावरुन टीकास्त्र डागले. ठाकरे म्हणाले, “मला कळले की, रॉकेट, रणगाडे वैगेरे वैगेरे…काय काय त्यांना देत आहेत. आता घरात काम करणाऱ्यांना पण वाय प्लस, झेड प्लस दर्जाची सुरक्षा देत आहेत. मात्र, सर्वसामान्यांची सुरक्षा वाऱ्यावर सोडली आहे. राज्यात महिला सुरक्षित नाहीत. सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार होत आहे. पण इकडे गद्दारांची सुरक्षा केली जात आहे” असा खोचक टोला उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला लगावला आहे.
अशोक चव्हाण गेल्यापासून काँग्रेसमध्ये नवचैतन्य
पुढे ते म्हणाले, “आता सुरतमध्ये एक जादू झाली आणि भाजपाचा उमेदवार बिनविरोध निवडून आला. अशा प्रकारची जादू आता होऊ लागली तर सर्वसामान्य लोक काय शिल्लख राहणार. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आणि देशात इंडिया आघाडी हेच एक यावर उत्तर आहे. राज्यात महाविकास आघाडीचे ४८ खासदार निवडून येतील, असे वाटत आहे”, असे मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले. “त्याचबरोबर अशोक चव्हाण भाजपात गेल्यापासून काँग्रेसमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे” असा खोचक टोला देखील उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.