पुणे जिल्ह्यात भाजपचे ऑपरेशन लोटस! 'हा' बडा नेता काँग्रेसला ठोकणार रामराम, उद्या पक्षप्रवेश
सासवड: काँग्रेसमध्ये पूर्वीप्रमाणे संवाद राहिला नाही आणि जिथे संवाद नसतो तिथे छोटे कुटुंब होते. केवळ पारिवारिक संवाद राहिले आणि इतर बाबतीत विसंवाद राहिले आणि त्यामुळे पक्षावर पराभवाची वेळ आली. अशा शब्दात पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. तर आघाडीचे राजकारण कायमच राहिल्याने पुरंदरच्या विकासाला ब्रेक बसला आहे, असे सांगत बुधवारी (१६ जुलै) भाजप प्रवेश करणार असल्याची घोषणा त्यांनी केली.
पुरंदर हवेलीचे माजी आमदार संजय जगताप यांनी नुकताच कॉंग्रेस पक्ष सदस्यत्वाचा आणि जिल्हा कॉंगेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. या पार्श्वभूमीवर त्यांनी कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्याचे आयोजन केले होते. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीच्या राजकारणावर परखड शब्दात मत व्यक्त केले आहे. यावेळी जेष्ठ नेते नंदुकाका जगताप, मार्तंड भोंडे, महादेव टिळेकर, यशवंत जगताप, सुनीता कोलते, संदीप फडतरे, ॲड विजय भालेराव, सागर जगताप, देविदास कामठे अादी उपस्थित होते.
१९८० मध्ये पहिली आघाडी झाली. त्यानंतर अनेकवर्षे सर्वांना घेऊन संघटनात्मक, संस्थात्मक कामे केली. भांडत बसलो तर तिथेच राहीन, संघटनात्मक कामे करीत राहिलो तर पुढे जाईल ही काकांची शिकवण आहे. १९८५ मधे काय झाले हे सर्वांना माहिती आहे. आतापर्यंत अनेक पराभव आले मात्र आपण थांबलो नाही. २००४ मध्ये चंदूकाकांना आठ महिने संधी दिली त्यानंतर पुन्हा पराभव झाला. मात्र आपण खचलो नाही. मला आणि माझ्या कुटुंबाला सतत बदनाम करण्याचे काम केले. २०१४ मधे आघाडीत बिघाडी झाली;मात्र आम्ही काँग्रेस बरोबर राहिलो. २०१९ आणि २०२४ मध्ये माझ्या उमेदवारीवर बोट दाखवले होते.
अंतर्गत राजकारणावर जोरदार टीकास्त्र
मी अनेक प्रस्ताव मांडले ते जिल्ह्याच्या पुढेच गेले नाहीत. हवेलीतील पाण्याच्या योजनेचे प्रस्ताव मांडले; मात्र ते पुढे गेलेच नाहीत. अशा शब्दात कॉंग्रेसच्या अंतर्गत राजकारणावर जोरदार टीकास्त्र जगताप यांनी सोडले. शेतकऱ्यांचा सहभाग असेल तिथेच विमानतळ झाले पाहिजे. गुंजवणीचे योग्य नियोजन आपल्याला करायचे आहे. आपण जिथे जातोय तिथे प्रत्येक प्रश्नाला उचलून धरले जाईल याची खात्री आहे. त्यामुळेच भाजपमध्ये जात आहे. अशा शब्दात जगताप यांनी भाजप प्रवेशाबाबत भूमिका स्पष्ट केली आहे.
राष्ट्रवादीच्या गटबाजीवर सडकून टीका
घेतलेला निर्णय योग आहे. परंतु विधानसभा निवडणुकीपूर्वी निर्णय घेतला असतातर आज आपण सन्मानाने विधानसभेत बसलो असतो. विधानसभा निवडणुकीत आपण मित्र पक्षावर विश्वास ठेवला आणि त्यांनी आपला केसाने गळा कापला. ते एकमेकांवर टीका करीत होते आणि आपण यांच्यावर विश्वास ठेवत बसलो. आपण राष्ट्रवादी काँग्रेसवर विश्वास ठेवला. सुप्रिया सुळे यांची मते मिळतील, ही अपेक्षा ठेवून बसलो; मात्र त्यांनी आपला विश्वासघात केला. अशा भावना व्यक्त करीत कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या गटबाजीवर सडकून टीका केली.