
विट्यात भांड्याच्या दुकानाला भीषण आग; चौघांचा होरपळून मृत्यू
विटा : विटा येथील जुन्या वासुंबे रस्त्यावरील असणाऱ्या सावरकरनगरमध्ये विष्णू जोशी यांचे जय हनुमान स्टील सेंटर अँड इलेक्ट्रॉनिक्स हे दुकान आहे. तीन मजली इमारतीमध्ये सर्वात खालच्या मजल्यावर दुकान आहे. तर वरच्या दोन मजल्यांवर जोशी कुटुंब वास्तव्याला आहेत. या दुकानाला आगा लागल्याची घटना सोमवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. ही आग नेमकी कशामुळे लागली याबद्दलचे कारण समोर आलेले नाही. मात्र शॉर्टसर्किटमुळे किंवा दुकानातील फ्रिजच्या सिलेंडरचा स्फोट झाल्याने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
या आगीत दुकान मालक विष्णू पांडुरंग जोशी (वय ४७), त्यांची पत्नी सुनंदा विष्णू जोशी (वय ४२), मुलगी प्रियंका योगेश इंगळे (वय २५) आणि नात सृष्टी योगेश इंगळे (वय २) या चौघांचा होरपळून मृत्यू झाला आहे. प्रियंका इंगळे यांचे सासर गोव्यात आहे. १६ नोव्हेंबरला भावाचे लग्न असल्याने त्या माहेरी विट्यात आल्या होत्या. प्रियंका या गरोदर होत्या.
रविवारी लग्नाच्या खरेदीनिमित्त जोशी कुटुंबीय दिवसभर बाहेर होते. रात्री उशिरा ते घरी परतले होते. धावपळ, दगदग यामुळे जोशी कुटुंबीय सकाळी लवकर उठले नसावे असे स्थानिकांना वाटले. सकाळी साडेआठच्या दरम्यान दुकानाच्या रोलिंग शटरमधून आणि कडेच्या फटीतून धुरीचे लोट येत असल्याचे आजुबाजूच्या लोकांना दिसताच स्थानिकांना शंका आली. त्यांनी वरच्या मजल्यावरील दुकान मालकांना हाक मारली परंतु काहीही उत्तर आले नाही. दुकानाच्या वरच्या दोन मजल्यातील लोकांपर्यंत आवाज जात नसावा, असे सर्वांना वाटत होते.
काहींनी शटर तोडून घरात अडकलेल्यांची सुटका करण्याचा प्रयत्न केला. अखेरीस शटर तोडले तेव्हा आगीच्या ज्वाळा आणि धुरांचे लोट एकदम बाहेर पडले. सुरुवातीच्या काळात कमी प्रमाणात वाटणारी आग आसपासच्या लोकांनी विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु, बघता- बघता या आगीने रौद्ररूप धारण केले. विटा पालिकेचा अग्निशमन बंब तातडीने घटनास्थळावर दाखल झाला. काही नागरिकांच्या मदतीने आग विझविण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनाही तात्काळ पाचारण करण्यात आले. तोपर्यंत घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली. या अचानक लागलेल्या आगीत इमारतीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर जोशी कुटुंबातील सहाजण अडकले आहेत, अशी माहिती मिळताच त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू झाले.
इमारतीत वरच्या मजल्यावर जाण्यासाठी एकच मार्ग असल्यामुळे मदत कार्यात अडथळे येत होते. शिवाय या इमारतीच्या दोन्ही बाजूंना एकमेकांना चिटकून घरं असल्याने आग विझवण्यासाठी आणि मदत कार्यात अडथळे येत होते. आगीची दाहकता आणि एकूणच परिस्थिती लक्षात घेत विटा पालिकेचा अग्निशमन अपुरा पडतो हे लक्षात आल्याने सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास कडेगांव, कुंडल, उदगिरी कारखान्याचे अग्निशमन बंब, पलुस, तासगावमधील अग्निशमन असे एकूण सहा अग्निशमन बंब मागविण्यात आले. दुपारी एक वाजेपर्यंत आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न केले.
दरम्यान, या आगीमध्ये विष्णू जोशी यांच्यासह त्यांच्या पत्नी, मुलगी आणि नातीचा भाजून मृत्यू झाल्याचे समोर आले. तर त्यांच्या दोन मुलांना जखमी अवस्थेत बाहेर काढण्यात आले आहे. खासदार विशाल पाटील यांनी घटनास्थळाची पाहणी केली. आमदार सुहास बाबर, माजी आमदार वैभव पाटील यांनी घटनास्थळी जाऊन आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना आग विझविण्यासाठी मदत करीत होते.