
Garba
नवरात्रीचे दिवस जवळ आले की गरबा आणि डांडियाची धूम सुरू होते. महाराष्ट्रासह गुजरातमध्ये या पारंपरिक नृत्याची विशेष क्रेझ पाहायला मिळते. ढोल-ताशांचा आवाज, रंगीबेरंगी कपडे आणि गरब्याच्या तालावर थिरकणारी तरुणाई, असं उत्साहाचं वातावरण सगळीकडे पाहायला मिळतं. मात्र याच गरबा कार्यक्रमांवरून आता महाराष्ट्रात एक वेगळाच वाद निर्माण झाला आहे.
गरबा खेळण्यासाठी मुलींना भाडेतत्त्वावर बोलावलं जात असल्याचा दावा संभाजी ब्रिगेडकडून करण्यात आला आहे. काही ठिकाणी मुलींची 1000 ते 5000 रुपयांपर्यंत बोली लावली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकारावर संभाजी ब्रिगेडने संताप व्यक्त केला आहे.
संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते ॲड. संतोष शिंदे यांनी या कथित प्रकारावर तीव्र आक्षेप घेतला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, पारंपरिक गरबा आणि धार्मिक उत्सवाला व्यावसायिक स्वरूप देताना काही ठिकाणी चुकीचे प्रकार केले जात आहेत. “महाराष्ट्रात भाडेतत्त्वावर गरब्यासाठी मुली देण्याचा हा गोरखधंदा संभाजी ब्रिगेड खपवून घेणार नाही,” अशी भूमिका संतोष शिंदे यांनी मांडली.
गरबा डान्ससाठी मुला-मुलींना 1000 ते 5000 रुपयांपर्यंत भाड्याने बोलावलं जात असेल, तर अशा कार्यक्रमांना विरोध केला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
पुरोगामी महाराष्ट्रात पारंपरिक उत्सवाच्या नावाखाली अशा प्रकारांना थारा मिळता कामा नये, असं संभाजी ब्रिगेडने म्हटलं आहे. गरबा आणि डांडिया हा केवळ मनोरंजनाचा कार्यक्रम नसून त्याला सांस्कृतिक आणि धार्मिक पार्श्वभूमी आहे. त्यामुळे या उत्सवाचं स्वरूप व्यावसायिक फायद्यासाठी बदललं जाऊ नये, अशी भूमिका शिंदे यांनी घेतली.
दरम्यान, राज्यात सध्या दुष्काळसदृश परिस्थिती असल्याचा मुद्दाही संभाजी ब्रिगेडने उपस्थित केला. शेतकरी संकटात असताना उत्सव साजरा करताना सामाजिक भान ठेवण्याची गरज असल्याचं संघटनेचं म्हणणं आहे.
नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर गरबा आणि डांडिया कार्यक्रमांचं आयोजन मोठ्या प्रमाणात केलं जातं. अशा कार्यक्रमांमध्ये मोठ्या संख्येने तरुण-तरुणी सहभागी होतात. त्यामुळे आयोजकांनी कार्यक्रमांचं नियोजन करताना नियमांचं पालन करावं आणि उत्सवाला गालबोट लागेल असे प्रकार टाळावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.