मी नाचायला नव्हे तर..., पुणे पुस्तक महोत्सवात गौतमी पाटील यांनी व्यक्त केली भावना
पुणे : मी कधीही पुस्तक वाचलं नाही कारण मला लहानपणापासूनच डान्स बद्दल आकर्षण होत आणि माझ्या संघर्षांबाबत सर्वानाच माहीत आहे. नेहेमी एखाद्याच्या वाढदिवसाला किंवा वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी डान्स करायला जात असते पण आज मी नाचायला नाही तर इथं पुस्तक वाचायला आली आहे, अशी भावना लावणी कलाकार गौतमी पाटील यांनी व्यक्त केली.
पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज येथे सुरू असलेल्या पुस्तक महोत्सवाला अतिशय उत्तम असा प्रतिसाद मिळत आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील विविध मान्यवर या महोत्सवाला भेट देत आहेत. अशातच शनिवारी लावणी कलाकार गौतमी पाटील यांनी देखील पुणे पुस्तक महोत्सवाला भेट दिली. यावेळी त्यांनी उत्सव महोत्सवातील बुक स्टॉलला देखील भेट दिली. तसेच महोत्सवात संविधानाची मूळ प्रत देखील बघितली. यावेळी संयोजक राजेश पांडे यांनी पुस्तक भेट देत गौतमी पाटील यांचा सत्कार केला.
हे सुद्धा वाचा : सांगलीतून रुपाली चाकणकर यांचा मोठा दावा; म्हणाल्या, आता आमच्या पक्षात…
सर्वांनी पुस्तक वाचलं पाहिजे
गौतमी पाटील म्हणाल्या, मी आयुष्यात कधीही पुस्तक वाचलं नाही. मला लहान पणापासूनच डान्सबाबत आवड होती. पण आत्ता मी यापुढे पुस्तक वाचणार आहे. मला छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत पुस्तक वाचायला आवडेल. सर्वांनी पुस्तक हे वाचलं पाहिजे यातून खूप काही शिकायला मिळत. मी देखील आत्ता यापुढे पुस्तक वाचणार असल्याचं यावेळी पाटील यांनी सांगितले.
पुण्यात पुस्तक महोत्सव
पुणे पुस्तक महोत्सव फर्ग्यूसन महाविद्यालयाच्या मैदानात सुरू आहे. या महोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या (एनबीटी) वतीने या पुस्तक महोत्सवाचे आयोजन पुण्यात करण्यात आले आहे. गेल्या वर्षी पासून या प्रदर्शनाचे आयोजन पुण्यात करण्यात येत आहे. या वर्षी पुणे पुस्तक महोत्सव हा १४ ते २२ डिसेंबरदरम्यान पार पडत आहे. महोत्सवादरम्यान भारतीय भाषांमधील पुस्तकांची दालने सकाळी १० ते रात्री १० या वेळेत सुरू राहतील, अशी माहिती राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे (एनबीटी) विश्वस्त राजेश पांडे यांनी दिली. गेल्या वर्षीच्या महोत्सवाने चार गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केले असून यंदा पाच विक्रम मोडण्याचे उद्दिष्ट आहे, अशी माहिती महोत्सवाच्या समन्वयक बागेश्री मंथलकर यांनी दिली. ‘सरस्वती यंत्र कलाकृतीतील विश्वविक्रमाने महोत्सवाची सुरुवात पुण्याचे पुस्तकांशी असलेले सखोल नाते दर्शविते. राजेश पांडे यांनी सांगितले.