
शासनाने दिवाळीपूर्वी आपद्रस्त शेतकऱ्यांना पाच हजार रुपयांची मदत जाहीर केली असून, उर्वरित मदतीबाबत शासनस्तरावर निर्णय घेतला जाणार आहे. धानाचे कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोंदिया जिल्ह्यात यंदा धान उत्पादक शेतकऱ्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. पावसातील खंडामुळे पिकांची वाढ खुंटली असून, फुटव्यांची संख्या कमी होणे, दाणे भरण्यावर परिणाम होणे आणि जमिनीतील ओलावा घटणे अशा समस्यांमुळे उत्पादन घटण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यातच खोडकिडा, तुडतुडा, मावा आणि करपा यांसारख्या किडी-रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांना वारंवार फवारणी करावी लागत आहे. परिणामी, उत्पादन खर्चात वाढ होत असून, अपेक्षित उत्पन्न मिळण्याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे.
तिरोडा तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामात ३१ हजार ८६८.०१ हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात आली होती. मात्र, पेरणीनंतर पावसाने ओढ दिल्याने पिकांच्या वाढीवर परिणाम झाला. प्रशासनाने तालुक्यातील १२५ गावांमधील नुकसानाचे पंचनामे पूर्ण केले आहेत. सुमारे २० हजार ४०० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची प्रतीक्षा आहे.
गोंदिया, सालेकसा, गोरेगाव, देवरी, आमगाव, सडक अर्जुनी आणि अर्जुनी मोरगाव या तालुक्यांतही नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे सुरू आहेत. या प्रक्रियेत बाधित क्षेत्र आणि शेतकऱ्यांची माहिती संकलित केली जात आहे. अहवाल पूर्ण झाल्यानंतर मदतीबाबत पुढील कार्यवाही होण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, पीककर्जाची परतफेड, वाढता उत्पादन खर्च आणि घटणारे उत्पन्न यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे जाहीर मदत लवकर मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
किडरोगांमुळे उत्पादन खर्चात वाढ धानपिकावर खोडकिडा, तुडतुडा आणि करपा यांसारख्या किडी-रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने पिकाची वाढ, लोंब्यांची स्थिती आणि दाणे भरण्याच्या प्रक्रियेवर परिणाम झाला. बाधित पिकांवर नियंत्रण मिळवण्यासाठी औषधांची फवारणी करावी लागते. यामुळे बियाणे, खते, मजुरी, पाणी आणि कीटकनाशकांवरील खर्च आधीच झालेला असताना शेतकऱ्यांवर अतिरिक्त आर्थिक भार पडला.
खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडण्याची शक्यता आहे. पेरणी, बियाणे, खते, मजुरी आणि मशागतीचा खर्च वसूल करणे कठीण झाले आहे. तिरोडा तालुक्यातील १२५ गावांचे पंचनामे पूर्ण झाले असून, अन्य सात तालुक्यांत प्रक्रिया सुरू आहे. अंतिम आकडेवारी आणि शासनाच्या मदतीकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
💡 Frequently Asked Questions
1. गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यात किती क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले?
तिरोडा तालुक्यात पावसाच्या खंडामुळे सुमारे 20,400 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे 125 गावांतील 23,425 शेतकरी बाधित झाले आहेत.
2. गोंदिया जिल्ह्यात कोणत्या तालुक्यांमध्ये पंचनामे सुरू आहेत?
गोंदिया, सालेकसा, गोरेगाव, देवरी, आमगाव, सडक अर्जुनी आणि अर्जुनी मोरगाव या 7 तालुक्यांमध्ये नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे सुरू आहेत.
3. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाने किती मदत जाहीर केली आहे?
दिलेल्या माहितीनुसार, शासनाने दिवाळीपूर्वी आपद्ग्रस्त शेतकऱ्यांसाठी 5,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. उर्वरित मदतीबाबत शासनस्तरावर निर्णय घेतला जाणार आहे.