
Gopichand Padalkar Controversial statement on ncp jayant patil political news
आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जेष्ठ नेते जयंत पाटील यांच्यावर टीका करताना त्यांचा एकेरी उल्लेख केला. त्याचबरोबर जयंत पाटील यांच्या वडिलांचे नाव घेत त्यांच्यावर जहरी टीका केली आहे. राजाराम पाटील यांच्या नावाचा उल्लेख करत एकेरी आणि अर्वाच्च भाषा वापरली. गोपीचंद पडळकर यांनी पातळी सोडून जयंत पाटलांवर टीका केली. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नेमकं चालले तरी काय आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्याचबरोबर जनतेचे प्रतिनिधी या पद्धतीची भाषा वापरत असतील तर विकासाचे राजकारण लांबच राहिल अशा भावना देखील व्यक्त केल्या जात आहेत.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
काय म्हणाले गोपीचंद पडळकर?
“अरे जयंत पाटला तुझ्या सारखा भिकारी अवलाद गोपीचंद पडळकरची नाही. माझ्यात कार्यक्रम करायची ती धमक आहे. तुझ्यासारखी ती अवलाद नाही. तू राजाराम पाटलाने काढलेली औलाद मला अजिबात वाटत नाही. काहीतरी गडबड असणार आहे? एवढ्या खालच्या लेव्हलला? आता माझा दांडीयाचा कार्यक्रम आहे. ये बघायला. तुझे डोळे दिपून जातील कार्यक्रम बघून, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली होती. माणसं पाठवली. कशासाठी? गोपीचंद पडळकरने कुठल्या व्यापाऱ्याकडून पैसे घेतले का? घ्या एखादा मधला व्यापारी घ्या आणि त्याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करा,” असेही गोपीचंद पडळकर म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावर राजकीय वातावरण तापले असून कारवाईची मागणी केली जात आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांवर अर्वाच्च भाषेत टीका केल्यानंतर शरद पवार गटाकडून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. सतेज पाटील यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. सतेज पाटील यांनी लिहिले आहे की, “गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर केलेली टीका ही महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकीय परंपरेचा आणि राजारामबापू पाटील कुटुंबाच्या प्रतिष्ठेचा अवमान आहे. पडळकर यांनी वापरलेली असभ्य भाषा ही स्तरहीन आणि समाजातील सभ्यता पायदळी तुडवणारी आहे. भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षाच्या आमदाराने सार्वजनिक मंचावर अशा शब्दांचा वापर करणे हे महाराष्ट्राच्या परंपरेचा अपमान आहे. याचा तीव्र निषेध करतो,” अशा शब्दांत आमदार बंटी पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे.