तो पास झाला पण त्यांचा जीव गेला, अपघातप्रकरणी पालकांवरही गुन्हा दाखल
बारावी पास झाल्यामुळे अल्पवयीन मुलगा व त्याचे काही मित्र पार्टीसाठी गेले होते. पार्टी करून तिघेजण भरधाव पोर्शो कारने परतत असताना त्यांनी कल्याणीनगर येथील एअरपोर्ट रोडवर दोन आयटी इंजिनिअर तरुण-तरुणींच्या दुचाकीला जोराची धडक दिली.
पुणे : बारावी पास झाल्यामुळे अल्पवयीन मुलगा व त्याचे काही मित्र पार्टीसाठी गेले होते. पार्टी करून तिघेजण भरधाव पोर्शो कारने परतत असताना त्यांनी कल्याणीनगर येथील एअरपोर्ट रोडवर दोन आयटी इंजिनिअर तरुण-तरुणींच्या दुचाकीला जोराची धडक दिली. ही धडक इतकी भयंकर होती की, कारने तरुणीला जवळपास ५० मीटर अंतरावर फरफटत नेले होते.
अनिस हा मध्यप्रदेशातील पाली या गावचा होता. तो आयटी इंजिनिअर होता. कल्याणीनगर भागातीलच एका मोठ्या आयटी कंपनीत तो नोकरी करत होता. तो पुण्यात विमानतळ परिसरात राहत होता. तर, अश्विनी ही देखील आयटी इंजिनिअर होती. ती खराडी परिसरात राहत होती. त्याच भागातील एका आयटी कंपनीत नोकरी करत होती. नुकताच तिचा जॉब गेला होता. तसेच, ती दुसरा जॉब शोधत होती. ती मूळची मध्यप्रदेशातील जबलपुर येथील होती.
गेल्या काही वर्षांपासून दोघेही पुण्यात होते. दरम्यान, त्यांची पार्टी होती. त्यानिमित्ताने ते बॉलर या पबमध्ये गेले होते. पार्टीनंतर नियमानुसार बॉलर पब दिडच्या सुमारास बंद झाला. पोलिसांनी दोन वाजता संबंधित पबला भेट देऊन तो बंद असल्याची खात्री देखील केली होती. पब बंद झाल्यानंतर हे सर्व मित्र दुचाकीवरून कल्याणीनगर परिसरात आले. ते कल्याणीनगर येथील एअरपोर्ट रोडवर गप्पा मारत थांबले होते. गप्पा मारल्यानंतर अनिस व अश्विनी एका दुचाकीवरून एअरपोर्टला जाण्यासाठी निघाले. त्यांनी यु टर्न घेतला असता पाठिमागून आलेल्या पोर्शो कारने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली आणि त्यात त्या दोघांचा मृत्यू झाला. कारला दोन्ही बाजूला नंबर प्लेट नव्हत्या.
निबंध लिहावा लागणार
ब्रह्मा रीअँलिटीच्या विशाल अगरवाल या बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाला या अपघात प्रकरणी बाल न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला अटी व शर्तीवर जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाने त्याला १५ दिवस वाहतूक पोलिसांसोबत काम करण्यासोबतच अपघात या विषयावर निबंध लिहिण्याची अट घातली आहे. तो आता येरवडा वाहतूक विभागासोबत वाहतूक नियम करणार आहे. पोलिसांनी मुलाला ताब्यात घेऊन या गुन्ह्यात भादवी कलम ३०४ (अ) नुसार कलम लावले. तर, मोटार वाहन कायद्यानेही गुन्हा नोंद केला. त्याला येरवडा पोलिसांनी लागलीच सुट्टीच्या बाल न्यायालयात हजर केले. तसेच, त्याची पोलीस कोठडी देखील मागितली. परंतु, न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला. न्यायालयाने त्याला काही अटी व शर्तीवर जामीन दिल्याचे मुलाचे वकिल अॅड. प्रशांत पाटील यांनी सांगितले. मुलाने दारू सोडण्यासाठी चांगल्या डॉक्टरांकडून उपचार व समूपोदेशन घ्यावे, असेही म्हंटले आहे. या सर्व बाबीनंतर पोलिसांनी त्याचा अहवाल न्यायालयात सादर करायचा आहे.
पालकांवरही गुन्हा दाखल
अपघाताच्या प्रकरणात कार चालविणाऱ्या मुलावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे. तो अल्पवयीन असूनही त्यास पबमध्ये दारू विक्री केल्याने पब चालकावर आणि मुलाला गाडी देणाऱ्या पालकांवर बालन्याय (मुलांची काळजी आणि संरक्षण) कायद्याच्या कलम ७५ आणि ७७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली.
Web Title: He passed the exam but the two people lost their lives the parents were also booked for the accident nrdm