Hearing in Mumbai High Court on cancellation of Prashant Koratkar's bail
मुंबई : कथित पत्रकार प्रशांत कोरटकर याने इतिहासकार इंद्रजीत सावंत यांना फोन करून छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह भाषेत वक्तव्ये केली होती. यामुळे राज्यामध्ये नवीन वादाला तोंड फुटले. प्रशांत कोरटकर याने छावा चित्रपट ज्यांच्या पुस्तकावर आधारित आहे अशा इंद्रजीत सावंत यांना धमकी दिली होती. यानंतर आता प्रशांत कोरटकर याला मुंबई उच्च न्यायायला दणका दिला आहे.
प्रशांत कोरटकर याच्या अडचणींमध्ये वाढ झाल्यानंतर त्याने त्याचा फोन हॅक झाला होता असा दावा केला. याबाबतचं कोल्हापूर सत्र न्यायालयाचं निरिक्षण खटल्याच्या नोंदीतून काढून टाकण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. राज्य सरकारची बाजू ऐकून योग्य निर्णय घ्यावा असं मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलं आहे. त्यामुळे हा प्रशांत कोरटकरसाठी मोठा झटका मानला जात आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
कोल्हापूर सत्र न्यायालयाकडून प्रशांत कोरटकर याला अंतरिम जामीन मिळाला होता. मात्र हा जामीन रद्द करण्यात यावा अशी मागणी राज्यभरातून केली जात आहे. राज्यभरामध्ये कोरटकर विरोधात आक्रमक पवित्रा घेण्यात आला असून विरोधकांनी देखील टीकेची झोड उठवली आहे. कोरटकर याचा वक्तव्यामुळे त्याचा जामीन रद्द करण्यात यावा अशी मागणी करण्यात येत होती. राज्यातील वाढत्या रोषामुळे राज्य सरकारला देखील याबाबत कठोर पावले उचलावी लागली आहेत. राज्य सरकारने जामीन रद्द करावा यासाठी याचिका केली होती. या याचिकेवर सुनावणी पार पडली आहे.
त्यानंतर वकील असीम सरोदे यांनी त्यांची भूमिका मांडली आहे. ते म्हणाले की “कोरटकरची भाषा असभ्य, आक्षेपार्ह व क्रूर होती. त्याची भाषा छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान करणारी व जातीय तेढ निर्माण करणारी होती. राज्य सरकारकडून कोल्हापूरच्या न्यायालयामध्ये अटकेपासून संरक्षण मिळण्यासाठी अर्ज दाखल करण्यात आला. तो अर्ज लगेच मान्य करुन न्यायालयाने त्याला जामीन दिला. हा निकाल देत असताना सरकारी पक्षाची आणि पोलिसांची बाजू जाणून घेतली नाही. इंद्रजित सावंत यांची काय बाजू आहे? हे ऐकून घेतलं गेलं नाही. एकतर्फी बेकायदेशीर पद्धतीने आदेश देण्यात आला होता,” असे मत असीम सरोदे यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “मुंबई न्यायालयाने याची गंभीर दखल घेऊन कायद्याची बाजू लक्षात घेऊन याची कोल्हापूर न्यायालयामध्ये सुनावणी झाली पाहिजे. कोल्हापूरला याची दुपारी सुनावणी आहे. प्रशांत कोरटकर सारख्या व्यक्तीला संरक्षण देताना कोर्टाने कोणत्या गोष्टींचा विचार केला हा महत्त्वाचा मुद्दा आहे. कोर्टाने टाकलेल्या अटी सुद्धा त्याने धुडकावून लगावल्या आहेत. सुरक्षित जागा शोधण्यासाठी तो सगळीकडे फिरतो आहे यामध्ये महाराष्ट्र पोलिसांची बदनामी होत आहे. महाराजांबाबत काहीही बोललं तरी चालेल त्या माणसाला संरक्षण मिळत आहे असं चित्र राज्यामध्ये निर्माण व्हायला नको,” असे स्पष्ट मत इंद्रजित सावंत यांचे वकील असीम सरोदे यांनी व्यक्त केले आहे.