राज्यात उष्णतेच्या लाटांचे तीव्र अलर्ट
पुणे : राज्यात कमाल तापमानाचा पारा पुढील काही दिवस वाढणार असल्याचे हवामान खात्याने वर्तवले. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्णतेचे अलर्ट देण्यात आले आहेत. विदर्भ वगळता संपूर्ण राज्यात उकाडा वाढला आहे. उष्णतेचा चटका बसत असून, कमाल तापमानाचा पाराही वाढत जातोय. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.
विदर्भात काही जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला असला, तरी बहुतांश ठिकाणी तापमान 40 अंशांच्या पुढे राहिले, असा अंदाज आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात उन्हाच्या झळांनी नागरिक बेजार झाले आहेत. पुण्यात मंगळवारी 40.8 अंश सेल्सियस तर सोलापूर 41.5 अंशांवर आहे. मराठवाड्यात परभणीत सलग चौथ्या दिवशी तापमान 42 अंशांच्या पुढे नोंदवले गेले. कोकणासह मुंबई, उपनगर, ठाणे, पालघरमध्ये उष्ण व दमट हवामान आहे. तर, विदर्भात अवकाळी पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे.
दरम्यान, अमरावती, वर्धा, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यांना अवकाळी पावसाचे अलर्ट देण्यात आले आहेत. मराठवाड्यातील बीड, लातूर, धाराशिवमध्ये उष्णतेचा अलर्ट आहे.
खामगाव सर्वाधिक ‘हॉट’
जिल्ह्यात खामगाव शहरात सर्वाधिक तापमान असल्याची नोंद दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील काही तालुक्यांचे तापमान 40 ते 41 अंशांवर पोहोचले आहे. अशातच खामगाव 45 अंशांवर गेले आहे. त्यामुळे सध्यातरी खामगाव शहर जिल्ह्यात सर्वाधिक ‘हॉट’ असल्याचे दिसून येत आहे.
उष्माघाताचे आढळत आहेत रुग्ण
राज्यातच नव्हे तर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यांतील तापमान वाढल्याने उष्माघाताशी संबंधित रुग्ण वाढत आहेत. अशातच जिल्ह्यात तब्बल 7 उष्माघाताचे रुग्ण असल्याची नोंद बुलडाणा जिल्हा आरोग्य विभागाने केली. दररोज तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्यामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. राज्यभरातील उष्मघाताच्या रुग्णसंख्येचा विचार केला तर ती संख्या 49 वर पोहोचली आहे.