मुंबई: रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. नागरीकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच सातारा जिल्ह्यातील वीर धरणातून आज दिनांक २६ जून रोजी २७ हजार ७९७ क्युसेक्स विसर्ग नीरा नदी पात्रात सुरू आहे. नदी काठच्या नागरीकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे, असे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने कळविले आहे.
कोकण किनारपट्टीला आज २६ जून २०२५ रोजीही सायंकाळी ५-३० पासून रात्री ८-३० वाजेपर्यंत भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र तर्फे पर्यंत ३.४ ते ४.२ मीटर पर्यंतच्या उंच लाटांचा इशारा देण्यात आला आहे. लहान होड्यांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
राज्यात मागील २४ तासांमध्ये (२६ जून २०२५ रोजी सकाळपर्यंत) वाशिम जिल्ह्यात ८८.५ मिमी पाऊस झाला आहे. तर यवतमाळ जिल्ह्यात ७०.३, नांदेड जिल्ह्यात ६०.३ मिमी, हिंगोली ४७.१, आणि बुलढाणा जिल्ह्यात ३५.४ मिमी सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.
राज्यात कालपासून आज २६ जून रोजी सकाळपर्यंत झालेल्या पावसाची सरासरी आकडेवारी पुढीलप्रमाणे (सर्व आकडे मिलिमीटरमध्ये) :- ठाणे ५.७, रायगड ६.८, रत्नागिरी १०.७, सिंधुदुर्ग १६.६, पालघर ५, नाशिक ११.४, धुळे ७.२, नंदुरबार ११.७, जळगाव १०.२, अहिल्यानगर ०.२, पुणे ३.३, सोलापूर ०.९, सातारा २.३, सांगली १.९, कोल्हापूर १५.१, छत्रपती संभाजीनगर २६.२, जालना २४.१, बीड १.२, लातूर ४.१, धाराशिव ०.३, नांदेड ६०.३, हिंगोली ४७.१, बुलढाणा ३५.४, अकोला २०.९, वाशिम ८८.५, अमरावती ९.८, यवतमाळ ७०.३, वर्धा १९.७, नागपूर ३०.८, भंडारा १३.८, गोंदिया ५.८, चंद्रपूर १५.१ आणि गडचिरोली जिल्ह्यात ९.६ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
मुंबई उपनगर जिल्ह्यात झाड पडून दोन व्यक्ती जखमी झाल्या आहेत. पाण्यात बुडून कोल्हापूर जिल्ह्यात एका व्यक्तीचा मृत्यू , रत्नागिरी जिल्ह्यात पुराच्या पाण्यात वाहून एक व्यक्तीचा मृत्यू, सातारा जिल्ह्यात नदीत पडून एका व्यक्तीचा मृत्यू, यवतमाळ जिल्ह्यात पाण्यात बुडून एक व्यक्तीचा मृत्यू आणि पाण्यात वाहून गेल्याने नाशिक जिल्ह्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
मराठवाडा विभागात अतिवृष्टी
मान्सूनने संपूर्ण राज्याला व्यापले आहे. गेल्या एका दिवसांत मराठवाड्यातील अनेक महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. छत्रपती संभाजीनगर, नांदेड, हिंगोली जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. आज आणि पुढील काही दिवस राज्याला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, कोल्हापूर आणि अन्य काही जिल्ह्यात पावसाचा जोर वाढत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत राज्यात सर्वत्रच मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.