
विदर्भात दमदार पाऊस; बळीराजा सुखावला, वर्ध्यात 18 मंडळांत अतिवृष्टी
नागपूर : विदर्भात कुठे दमदार तर कुठे मुसळधार पाऊस कोसळला. यामुळे रखडलेल्या पेरणीला वेग आला आहे. वर्धा जिल्ह्यातील महसूल मंडळात अतिवृष्टीच नोंद करण्यात आली. तर गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागात रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. वृक्ष कोसळल्याने अनेक मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. गोंदिया जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी गुरुवारी पहाटेपासून पाऊस बरसला.
वर्धा जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी ५०.४ मिमी पावसाची नोंद झाली. आष्टी तालुक्यात सर्वाधिक ७९ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. दक्षिण गडचिरोलीत बुधवारी रात्रीच्या सुमारास पावसाने जोरदार बॅटिंग केली. विजांच्या कडकडाट, सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली.
अहेरी तालुक्यातील आलापल्ली-बोरी नजीकच्या मुक्तापूर नाल्यावर पुलाचे बांधकाम सुरु असून, वाहतुकीसाठी तात्पुरता रस्ता तयार करण्यात आला. मात्र, रात्रीच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसात वाहून गेला. परिणामी, या मार्गावरील वाहतूक रात्रभर ठप्प पडली होती. गेल्या २४ तासात भामरागड तालुक्यात सर्वाधिक ७२.७ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.
गोंदियात तिसऱ्या दिवशीही हजेरी
गोंदिया जिल्ह्यात मंगळवारी सकाळपासून पावसाने हजेरी लावली. त्यानंतर बुधवारी मध्यरात्रीपासून जिल्हावासियांना झोडपून काढले. सलग तिसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी पहाटेपासून दमदार पाऊस बरसला. दुपारपर्यंत जिल्ह्यात पाऊस कोसळला. त्यानंतर पावसाने विश्रांती घेतली असली तरी आकाशात ढग दाटून होते. गत २४ तासात ३६.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर सर्वाधिक ४४.९ मिमी पाऊस आमगाव तालुक्यात झाला.
वर्ध्यातील नदीकाठच्या गावांना अलर्ट
मान्सूनच्या तोंडावर वर्धा जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. जिल्ह्यातील २९३ गावे नदीकाठावर असून, त्यापैकी २७ गावांचा पावसाळ्यात संपर्क तुटण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. संभाव्य पूरस्थितीचा सामना करण्यासाठी बचाव पथके, बोटी, जीवनरक्षक साहित्य तसेच नियंत्रण कक्ष सज्ज ठेवण्यात आले आहेत. नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.