
Hired campaigners working found employment due to maharashtra local body elections 2026
नांदेड : नांदेड मनपा प्रचाराची रणधुमाळी सुरू असून वीस प्रभागात विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांकडून रॅली, कॉर्नर बैठका आयोजित केल्या जात आहे, यासाठी माणसे जमवितांना उमेदवारांची पुरती दमछाक होत असून उमेदवारांना सभा, रॅलीचे मॅनेजमेंट करणाऱ्या ठेकेदारांमुळे मात्र दिलासा मिळाला आहे, ‘दामोजी’ मोजला की, काम फिनीश सभा, रॅली सुरू होण्याआधी महिला, पुरूषांचे जत्थेच्या जत्थे कार्यक्रमस्थळ हजर झाल्याचे चित्र पहावयास मिळत असून प्रचारामुळे महिलांना रोजगार मिळाला आहे, सकाळ, दुपार, संध्याकाळ हाताला काम मिळत असल्यामुळे लाडक्या बहिण व भावांना तात्पुरते का होईना, अच्छे दिन आले आहेत.
प्रचारासाठी महिला ठेकेदारही आघाडीवर
प्रचारासाठी महिलांना आणण्याची जबाबदारी घेणाऱ्या ठेकेदारांचे मात्र चांगभलं होत आहे, यात महिला ठेकेदारही आघाडीवर आहेत. नांदेड शहर व परिसरात एकही नवा उद्योग आला नाही, त्यामुळे बेरोजगारांना पुणे, मुंबईकडे धाव घ्यावी लागत आहे. पुण्या मुंबईला जावू न शकणारे लोक हंगामी उद्योग करून आपली उपजीविका भागवतात. सध्या महानगरपालिकेची निवडणुक असल्यामुळे रोजगारासाठी वणवण भटकंती करणाऱ्या पुरूष व महिलांच्या हाताला रोजगार मिळाला आहे.
हे देखील वाचा : खासदार संजय राऊत अन् DCM एकनाथ शिंदेंची भेट; राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा
ग्रामीण भागातील महिला शहरात
शहरात निवडणूक सुरू असल्याने प्रचार रॅली, कॉर्नर बैठका, छोटेखानी सभा यासाठी गर्दी जमवण्याचे दिव्य उमेदवारांना पार पाडावे लागत असून प्रमुख राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी शहरी भागासोबत शहरालगत असणाऱ्या ग्रामीण भागातील महिलांना रोजगाराची संधी मिळवून दिली असल्याचे दिसून आले आहे. शहरालगत असणाऱ्या अनेक गावांमधील महिला भल्या सकाळीच दाखल होत असून प्रभागा प्रभागातील रॅली, सभांना उपस्थित आपला भत्ता ते पक्का करत आहेत.
हे देखील वाचा : ठाकरे बंधूंना एकत्र येण्यासाठी 20 वर्षे का लागली? राज-उद्धव यांची बेधडक संयुक्त मुलाखत चर्चेत
पाचशे रुपये व अल्पोपहाराने सन्मान
प्रचार रॅली, सभेसाठी उमेदवारांना माणसे शोधण्याची आता गरज उरली नसून मनुष्यबळ पुरविणारे ठेकेदारच या निमित्ताने तयार झाले आहेत, यात महिला ठेकेदार आघाडीवर आहे, उमेदवारांकडून रॅली, सभेला आलेल्या महिला व पुरुषांचा पाचशे रूपये व अल्पोपहार देवून ‘सन्मान’ केला जात आहे, त्यामुळे सगळीकडे’ आनंदी आनंद गडे’ असे चित्र पहावयास मिळत आहे. सकाळ, दुपार संध्याकाळ विविध पक्षाकडून रोजगाराची संधी या निमित्ताने बेरोजगारांना दिली जात आहे. दिवसाकाठी हजार ते पंधराशे रूपये ‘खावून पिवून’ मिळत आहेत. त्यामुळे बेरोजगारांना तात्पुरते का होईना… ‘अच्छे दिन’ आले असल्याचे पहावयास मिळत आहे.