
honour-killing
नांदेड: स्वत:ची इभ्रत (Honour Killing) वाचवण्यासाठी डॉक्टर मुलीला (Doctor Murder) कुटुंबियांनी संपवल्याची धक्कादायक घटना नांदेडमध्ये (Nanded) उघडकीस आली आहे. या घटनेमुळे नांदेड हादरलं आहे. संतापजनक बाब म्हणजे, वडिलांसह भाऊ, मामा, चुलतभाऊ यांनी मिळून तिची हत्या केली आणि मृतदेहाची विल्हेवाट लावली होती. मुलीचं प्रेमप्रकरण असल्यामुळे त्यांनी तिची हत्या (Nanded Crime)करून शेतातच तिचा मृतदेह जाळला. त्यानंतर तिथे नांगरणी केली आणि कांद्याची लागवडदेखील केली. इतकं सगळं घडूनही गावाला याचा सुगावाही लागला नाही. मात्र मुलीच्या मित्रांनी आवाज उठवल्यानंतर सगळा प्रकार समोर आला.
मिळालेल्या माहितीनुसार 22 जानेवारी 2023 रोजी कुटुंबियांनी आपल्या मुलीची हत्या केली आणि 26 जानेवारी रोजी सगळा प्रकार समोर आला.
नांदेड (Nanded) जिल्ह्यातील महीपाल पिंपरी येथे एका डॉक्टर तरुणीची हत्या झाली. तिच्या घरच्या लोकांनी तिची घरी हत्या केली. मग आपल्याच शेतात नेऊन तिला जाळून टाकलं. पुढे त्या शेतामध्ये नांगरणी करुन कांदा लागवड केली. मात्र डॉक्टर मुलगी ज्या दिवसापासून बेपत्ता झाली तेव्हापासून तिच्या वर्गमित्रांना संशय येऊ लागला.तिचा काहीच सुगावा लागत नव्हता. अखेर तिच्या एका मैत्रिणीनं थेट जिल्हा पोलीस मुख्यालयात जाऊन महिला सुरक्षा कक्षाकडे तक्रार दिली. आणि तिथूनच खऱ्या अर्थाने तपासाची चक्रे फिरली.
जिल्हा पोलीस मुख्यालयाकडून या घटनेबाबत विचारणा झाल्यानंतर स्थानिक लिंबगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी खडबडून जागे झाले झाले. त्यांनी गावातल्या पोलीस पाटील भारत कदम यांना पाचारण केलं. त्यानंतर सापळा रचून गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी मुलीच्या वडिलांना ताब्यात घेतलं. आधी त्यांनी काही सांगण्यास नकार दिला पण पोलिसी खाक्या दाखवताच वडिलांनी हत्येची कबुली दिली. शिवाय या गुन्ह्यात सामील असलेल्या मुलीचा भाऊ, मामा, चुलतभाऊ यांचीही नावे त्यांनी सांगितली. पोलिसांनी तात्काळ मुलीच्या वडिलांसह पाच जणांवर हत्येचा गुन्हाही दाखल केला. नातेवाईकांपैकी एका व्यक्तीच्या मुलाशी प्रेमसंबध असल्यामुळं ही हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेवर संताप व्यक्त होत आहे. एक बाप आपल्या मुलीला असं क्रूरपणे संपवू कसं शकतो ? असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे.