horses of Dnyaneshwar Maharaj's palanquin paid homage to the venerable Bhausaheb Rangari Ganapati.
पुणे : वैष्णवांचा मेळा म्हटल्या जाणाऱ्या आषाढी वारीला सुरुवात झाली आहे. आज संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे देहूमधून प्रस्थान झाले आहे. त्याचबरोबर उद्या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे प्रस्तान आळंदीहून होणार आहे. पुणे शहरात पालखीचे आगमन येत्या गुरुवारी (दि.20) होणार असून दुसऱ्या दिवशी म्हणजे 21 जून रोजी दोन्ही पालख्यांचे पुण्यामध्ये मुक्काम असणार आहे. 22 जून रोजी दोन्ही पालख्या पुढील प्रवासांसाठी मार्गस्थ होणार आहेत. दरम्यान संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीतील मानाच्या अश्वांनी हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे दर्शन घेतले.
सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे संत ज्ञानेश्वर माऊलींच्या अश्वांनी दर्शन घेतले आहे. यावेळी भाविक आणि मान्यवरांच्या उपस्थितीत आरती करण्यात आली.अंकली (कर्नाटक) येथील श्रीमंत शितोळे सरकार यांचे अश्व अंकली येथून पायी येऊन दरवर्षी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीत सहभागी होत असतात. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यात या दोन अश्वांना मानाचे स्थान असते. या अश्वांनी पुण्यातील महत्त्वाच्या गणपती बाप्पांचे दर्शन घेतले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
उद्या (दि. १९ जून) ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे प्रस्थान ठेवण्यात येणार असून या पालखी सोहळ्यात हे दोन्ही अश्व सहभागी होऊन पंढरपूरपर्यंत जात असतात. वारकरी संप्रदायात १८३२ पासूनची ही समृद्ध परंपरा आहे. पालखी सोहळा मार्गस्थ झाल्यानंतर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या रथापुढे जो अश्व असतो तो माऊलींचा अश्व असतो. तर जरीपटका घेऊन अश्वस्वार असतो तो स्वाराचा अश्व असतो. असे हे दोन अश्व पालखी सोहळ्यात सहभागी होत असतात.
अंकली येथील शितोळे राजे यांच्याकडे या अश्वांची ही मानाची परंपरा आहे. मंगळवारी या अश्वांनी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टकडून श्रीमंत उर्जितसिंह राजे शितोळे सरकार, श्रीमंत महादजीराजे शितोळे सरकार यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. ट्रस्टचे अध्यक्ष श्री संजीव जावळे यांच्यासह विश्वस्त, भाविक आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
याचबरोबर पुण्यातील सुप्रसिद्ध अशा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे देखील या अश्वांनी दर्शन घेतले आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील मानाच्या अश्वांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या सभामंडपात प्रवेश करून गणरायाला मानवंदना दिली. या प्रसंगी “ज्ञानोबा माऊली तुकाराम” आणि “गणपती बाप्पा मोरया” च्या जयघोषात संपूर्ण मंदिर परिसर भक्तिभावाने न्हाऊन निघाला. सुमारे ३०० किलोमीटरचा पायी प्रवास करणारे हे अश्व आता दरवर्षी वारीपूर्वी दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेऊनच आळंदीच्या दिशेने मार्गस्थ होतात. यंदाही त्यांनी सभामंडपात येत गणरायाचे दर्शन घेतले.