
शिवजयंतीच्या दिवशीच शिवनेरीवर मोठी चेंगराचेंगरी; अनेक शिवभक्त जखमी, मध्यरात्रीच...
जुन्नर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवजयंती निमित्त दरवर्षी हजारो शिवभक्त शिवनेरी या किल्ल्यावर येत असतात. शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी होत असते. असे असताना यंदा मात्र शिवनेरी गडावरच मोठी चेंगराचेंगरी झाल्याचे समोर आले आहे. या चेंगराचेंगरीत 15 ते 20 शिवभक्त जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची आज शिवजयंती आहे. त्यामुळे या दिवसाचे निमित्त साधून शिवरायांचे जन्मस्थान असलेल्या जुन्नर येथील ऐतिहासिक शिवनेरी गडावर मध्यरात्रीपासूनच शिवभक्तांची अभूतपूर्व गर्दी उसळली. वाढत्या गर्दीमुळे नियोजन कोलमडले. याच कारणामुळे शिवनेरी गडावरच चेंगराचेंगरी झाली. यातच काही शिवभक्त जखमी झाले आहेत. मात्र, यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. प्राथमिक माहितीनुसार, ही चेंगराचेंगरी गर्दीचे नियोजनच कोलमडल्याने झाल्याचे समोर आले आहे.
शिवजयंतीनिमित्त दरवर्षी हजारोंच्या संख्येने शिवभक्त शिवनेरीवर येत असतात. त्यात यावर्षीही राज्यभरातून शिवज्योत घेऊन येणारे तरुण, विविध संघटनांचे कार्यकर्ते आणि शिवभक्त शिवनेरीवर दाखल झाले होते. मध्यरात्रीपासूनच गडाचा परिसर ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या जयघोषाने दुमदुमून गेला होता. मात्र, क्षमतेपेक्षा जास्त गर्दी झाल्याने परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. त्यानंतर ही चेंगराचेंगरी झाली.
नेमकं काय झालं?
शिवनेरी गडावरच्या अंबरखाण्याच्या खालच्या हत्ती दरवाजा परिसर आणि गणेश दरवाजा हे मार्ग अत्यंत अरुंद आहेत. शिवभक्तांची मोठी गर्दी होती. त्यातच या अरुंद मार्गांवरून एकाच वेळी हजारो शिवभक्त जमा झाले. गडावरून खाली उतरणाऱ्या लोकांचा लोंढा मोठा होता. तर खालून गडावर जाणाऱ्या लोकांसाठी जागाच उरली नाही, अशा स्थितीत वरुन खालच्या दिशेनं येणाऱ्या काही लोकांनी ढकलाढकली केली. रस्ते लहान आणि लोकांची संख्या प्रचंड असल्याने तिथे चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाली. यात काही शिवभक्त खाली पडले आणि जखमी झाले.
हेदेखील वाचा : Shivjayanti 2026: छत्रपती शिवाजी महाराजांचे 5 अनमोल विचार, आयुष्यात घडवतील मोठा बदल; मुलांना शिकवण द्यायलाच हवी