छत्रपती शिवरायांसाठी वेळ पडल्यास १०० गुन्हे अंगावर घेण्यास तयार; परशुराम उपरकरांचा हल्लाबोल
राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा दुर्घटने प्रकरणी सार्वजनिक बांधकामचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड आणि माजी आमदार परशुराम उपरकर यांच्यात आरोप प्रत्यारोपाचा खेळ सुरु आहे. अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी माजी आमदार परशुराम उपरकर आपल्याला त्रास देत असल्याचा आरोप करत माजी आमदार परशुराम उपरकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची परवानगी मागितली आहे. या प्रकरणी आता परशुराम उपरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. छत्रपती शिवरायांसाठी वेळ पडल्यास १०० गुन्हे अंगावर घेण्यास तयार आहे, असा हल्लाबोल परशुराम उपरकर यांनी केला आहे.
हेदेखील वाचा- राजकोट किल्ल्यावरील पुतळा दुर्घटना प्रकरणात सर्वगोड माफी केव्हा मागणार? ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा सवाल
उपरकर म्हणाले की, सार्वजनिक बांधकामचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी माझ्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी अधीक्षक अभियंता यांच्याकडे परवानगी पत्र दिले. छत्रपतींच्या पुतळ्याची दुर्घटना घडल्यानंतर पशार असताना त्यांनी 2 सप्टेंबरला जावक क्रमांक घालून पत्र तयार केले. ते ड्युटीवर नसताना पत्रावर सही कोणी केली? त्यांच्या पाठीमागे उपअभियंता बातुस्कर हे पशारांचे खेळ करीत आहेत. त्यांनी प्रत्यक्ष सही न मारता टॅबवर सही केली असावी. परंतु मी अधिक्षक अभियंत्यांना विनंती करतो की, सर्वगोड यांना माझ्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी परवानगी द्यावी. छत्रपती शिवरायांसाठी वेळ पडल्यास 100 गुन्हे अंगावर घेण्यास तयार आहे.
हेदेखील वाचा- शिवरायांच्या पुतळा दुर्घटनेतील आरोपी शिल्पकार जयदीप आपटेला अखेर अटक; पोलिसांची मोठी कारवाई
कणकवली येथील आपल्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत उपरकर बोलत होते. त्यांनी सांगितलं की, माहितीच्या अधिकारात 60 अर्ज केले आहेत. ही गोष्ट खरी आहे. मात्र, सर्वगोड यांनी कधीच कोणतीही माहिती दिली नाही. त्याविरुध्द राज्य माहीती अधिकाऱ्यांकडे 20 ते 25 अपिले दाखल केलेली आहेत. सर्वगोड यांनी रेल्वे स्टेशनच्या सुशोभिकरण कामाची अधिकार नसताना निविदा काढली आहे. अशाच अनेक कामांमध्ये त्यांनी घोळ केलेला आहे. या रेल्वे स्टेशन सुशोभिकरण निविदा काढताना पणवेल येथील ठेकेदारांची नावे काढली. मात्र, त्याचे काम शिरगांवकर यांनी केल्यामुळे त्यांचा सत्कार मंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला.
पालकमंत्र्यांचे सचिव अनिकेत पटवर्धन यांच्या माध्यमातून हा भ्रष्टाचार सुरु आहे. सर्वगोड हे मंत्रालयाच्या कार्यालयात किती वेळ असतात, याची माहिती घेतली पाहिजे. मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता हे अधिकारी सर्वगोड यांना पाठीशी घालत आहेत. चुकीच्या पद्धतीने त्यांचे प्रमोशन करण्यात आले आहे. 2800 कोटी आणले असे सांगतात, त्या 2800 कोटीची कामे कुठे दिसता आहेत? गणपतीत आजही सर्व रस्ते खड्डेमय आहेत. काम करायची कॅपॅसिटी नसलेल्चा ठेकेदारांना सर्वगोड कामे देतात. नौदल यांच्याकडून दिलेल्या पत्रात पुतळा कोसळला त्या कामाची वर्क ऑर्डरमध्ये कोणतीही रक्कम नाही. देखाबल दुरुस्ती 3 महिने आहे. त्यानंतर सार्वजनिक बांधकामाचे पैसे असल्याने त्या कामाची जबाबदारी ही सार्वजनिक बांधकामची आहे. याप्रकरणी आम्ही उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार आहे, असा इशारा उपरकर यांनी दिला आहे.
कालच जिल्हा न्यायालयात 66/24 या नंबरने सर्वगोड यांच्या विरोधात दावा दाखल केला आहे. 5 लाख 10 हजार रुपये अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. जिल्हा न्यायालयाने त्यांना समन्स बजावले आहे. सर्वगोड यांची माहिती उच्च न्यायालयात पुरावे सादर केले जाणार आहे. किल्ल्याची बांधणी सीआरझेडची परवानगी न घेता काम केले. राजकोट किल्ला येथील छत्रपतींच्या पुतळ्याची 6 फुटाची परवानगी असताना 28 फूट कोणी केली? निविदेच्या तारखांमध्ये तफावत आहेत. त्याविरुध्द कोर्टात जाणार असल्याचा इशारा उपरकर यांनी दिला आहे.