शिवरायांच्या पुतळा दुर्घटनेतील आरोपी शिल्पकार जयदीप आपटेला अखेर अटक; पोलिसांची मोठी कारवाई (फोटो सौजन्य- सोशल मिडीया)
राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याची दुर्घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी स्ट्रक्चरल कन्संल्टंट चेतन पाटील याला अटक केली होती. या अटकेनंतर आता पोलिसांनी पुन्हा एकदा मोठी कारवाई करत आरोपी शिल्पकार जयदीप आपटेला अटक केली आहे. जयदीप आटपटेला पोलिसांनी त्याच्या राहत्या घरातून अटक केली आहे. जयदीप गेल्या अनेक दिवसांपासून जयदीप फरार होता. पोलीस त्याचा शोध घेत होते.
हेदेखील वाचा- राजकोट किल्ल्यावरील पुतळा दुर्घटना प्रकरणात सर्वगोड माफी केव्हा मागणार? ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा सवाल
जयदीप रात्री त्याच्या घरी आई आणि बायकोला भेटण्यासाठी आला होता. याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी त्याच्या घरावर छापा टाकत जयदीपला अटक केली आहे. बुधवारी रात्री जयदीपला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. राजकोट किल्ल्यावरील दुर्घटनेनंतर राज्यातील वातावरण प्रचंड तापलं आहे. विरोधी पक्ष आंदोलन करत असून आरोपीला अटक करण्याची मागणी केली जात होती. याप्रकरणी पोलीस जयदीपचा शोध देखील घेत होते. आता अखेर जयदीपला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे.
पुतळा कोसळल्यानंतर मालवण पोलिसांनी आपटे आणि त्याचा सहकारी चेतन पाटील यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. पोलिसांना चेतन पाटीलला गेल्या आठवड्यात कोल्हापुरातून अटक केली होती. त्यानंतर आता पोलिसांनी कल्याणमधील राहत्या घरातून जयदीपला अटक केली आहे. त्याच्या शोधासाठी पोलिसांनी सात पथके तयार केली होती. कल्याणचे डीसीपी सचिन गुंजाळ यांच्या टीमने जयदीप आपटेला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरु करण्यात आली आहे.
हेदेखील वाचा- पुन्हा हिट अँड रनचा थरार, भरधाव कारने महिलेला इतकं फरफटतं नेलं की…, मालाडमध्ये नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, जयदीप आपटे अंधाराचा फायदा घेत पोलिसांची नजर चुकवत आपल्या पत्नी आणि आईला भेटण्यासाठी त्याच्या कल्याणच्या घरी आला होता. मात्र यावेळी तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला. कल्याणचे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी आरोपी जयदीप आपटेला सिंधुदुर्ग पोलिसांच्या ताब्यात दिले असून पोलीस सिंधुदुर्गच्या दिशेने रवाना झाले आहेत. जयदीप आपटेच्या अटकेनंतर आता पोलिसांच्या तपासाला वेगळी दिशा मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे.
या प्रकरणी भाजप नेते प्रवीण दरेकर म्हणाले की, ‘आमच्या सरकारवर टीका करणाऱ्यांनी आता तोंड बंद करावे. आपटे यांना अटक करण्यात पोलिसांना थोडा वेळ लागला हे खरे आहे. अटकेचे श्रेय आम्ही घेत नाही, पण पोलिसांनी त्यांचे काम केले.’ दरम्यान, आपटे याच्या अटकेनंतर राज्यात पुन्हा राजकारण तापले आहे. या पुतळ्याच्या उभारणीसाठी राज्याच्या तिजोरीतून २३६ कोटी रुपये घेतले असताना केवळ दीड कोटी रुपये खर्च झाल्याचा आरोप प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याची घटना घडली. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रातील वातावरण तापलं असून शिवप्रेमींकडून संताप व्यक्त केला जात आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. शिवाजी महाराजांचा ३५ फूट उंचीचा पुतळा कोसळल्यानंतर हा पुतळा तयार करणाऱ्या २५ वर्षीय जयदीप आपटेला नोटीस जारी करण्यात आली होती. पोलीस त्याचा शोध देखील घेत होते. याप्रकरणी सिंधुदुर्ग पोलिसांनी शिल्पकार जयदीप आपटे आणि स्ट्रक्चरल कन्संल्टंट चेतन पाटील या दोघांवर गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी स्ट्रक्चरल कन्संल्टंट चेतन पाटील याला आधीच अटक केली होती. त्यानंतर आता शिल्पकार जयदीप आपटेला देखील अटक करण्यात आली आहे.