माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार, कारखाना राज्यात पहिल्या पाचमध्ये आणून दाखवू; अजित पवारांचा विश्वास
बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माळेगाव कारखान्याचा चेअरमन मी स्वतः होणार असल्याचे जाहीर केले. माळेगाव कारखान्याचं भलं करायचं असेल, तर अजित पवारच करू शकतो, असे सांगतानाच, ‘लाथ मारीन तिथं पाणी काढण्याची हिंमत ठेवणाऱ्यांच्या हातातच कारखान्याची सत्ता द्या’, असे आवाहन त्यांनी केले. त्याचवेळी माळेगाव कारखाना राज्यात पहिल्या पाच कारखान्यांमध्ये आणून दाखवू, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
अजित पवार यांनी अध्यक्षपदाचे उमेदवार आपण स्वतः असल्याचे जाहीर केल्यानंतर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करून, त्यांच्या घोषणाची स्वागत केले. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत त्यांना समर्थन दिले. गेल्या अनेक दिवसांपासून माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत श्री नीलकंठेश्वर पॅनलचा अध्यक्षपदाचा उमेदवार कोण?, याची उत्सुकता सभासदांसह संपूर्ण राज्यात लागली होती. अजित पवारांच्या या घोषणेने निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे.
निळकंठेश्वर पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ पवार यांच्या हस्ते पाहुणेवाडी येथून करण्यात आला. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष केशवराव जगताप, बाळासाहेब तावरे, राजवर्धन शिंदे, संभाजी होळकर, यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
माळेगाव कारखान्यात मीच चेअरमन झालो तर…
बारामतीचा आमदार म्हणून मी राज्यात फिरत असतो. माळेगाव कारखान्यात मीच चेअरमन झालो तर कारखान्याचं कोणतं काम अडेल का? असा सवाल करत उपमुख्यमंत्री पवार यांनी मीच माझ्यासोबत 40 आमदार निवडून आणले आहेत. त्यातल्याच एकाला सहकार मंत्री बनवलं आहे. त्यामुळे आपली कामे कुठेही खोळंबणार नाहीत.
निवडणुकीत गटा-तटाचा विचार कोणी करू नये
मी स्वतः चेअर चेअरमन असल्यानंतर कारखान्यालाही शिस्त आल्याशिवाय राहणार नाही, असे ते म्हणाले. माळेगाव कारखान्याची निवडणूक पूर्ण ताकदीने लढवावी, गटा-तटाचा विचार कोणी करू नये. माळेगाव कारखान्याचं भलं करायचं असेल, तर अजित पवारच करू शकतो, असे सांगतानाच, लाथ मारीन तिथं पाणी काढण्याची हिंमत ठेवणाऱ्यांच्या हातातच कारखान्याची सत्ता द्या, असे आवाहन त्यांनी केले.