शासकीय कर्मचाऱ्यांनो, कार्यालयात ओळखपत्र लावूनच फिरा; अन्यथा होणार कारवाई
मुंबई : महाराष्ट्र सरकारकडून एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, राज्यातील सर्व शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना ओळखपत्र लावणे अनिवार्य केले आहे. शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांना कार्यालयीन वेळेत आपल्या पदाचे ओळखपत्र शरीराच्या दर्शनी भागावर लावणे बंधनकारक केले आहे. ते समोरून येणाऱ्या व्यक्तीला स्पष्टपणे दिसेल, असे आदेश देण्यात आले आहेत.
शासकीय कार्यालयात गेल्यावर अनेकदा कोणती व्यक्ती, कोणत्या पदावर कार्यरत आहे हे कळत नाही. त्यामुळे वादंग झाल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. त्यानंतर आता याबाबत महत्त्वपूर्ण पावले उचलण्यात आली आहेत. शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांना कार्यालयीन वेळेत आपल्या पदाचे ओळखपत्र बंधनकारक केले गेले आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कार्यालयीन प्रमुखांकडून शिस्तभंगाची कारवाई शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.
हेदेखील वाचा : स्थानिक स्वराज्य निवडणुकींचे बिगूल वाजले; अजित पवार स्वतः ऐकून घेणार नागरिकांच्या तक्रारी
दरम्यान, यापूर्वीही शासनाने 7 मे 2014 रोजी सर्व शासकीय-कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत ओळखपत्र दर्शनी भागावर लावावे, अशा सूचना दिल्या होत्या. मात्र, प्रत्यक्षात या नियमाचे पालन होत नसल्यामुळे अनेक तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. नागरिकांना शासकीय कार्यालयात अधिकारी किंवा कर्मचारी ओळखणे कठीण जात होते. त्यामुळे कामकाजात अडथळे निर्माण होत होते.
नागरिकांना होणार मोठा फायदा…
नागरिक जेव्हा शासकीय कार्यालयात आपल्या कामासाठी जातात, तेव्हा त्यांना संबंधित अधिकारी किवा कर्मचाऱ्यांची ओळख सहज पटावी, यासाठी ही अट घालण्यात आली आहे. आतापर्यंत ओळखपत्र न लावल्यामुळे अनेकदा कर्मचारी स्वतःची ओळख न सांगता टाळाटाळ करत होते. परिणामी, नागरिकांना कामाविना परत जावे लागे किंवा अनावश्यक त्रास सहन करावा लागत होता.
कामात येईल पारदर्शकता
या नियमामुळे आता मात्र प्रत्येक शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना आपले नाव आणि पदनाम असलेले ओळखपत्र समोर लावणे सक्तीचे झाल्याने नागरिकांच्या कामकाजात पारदर्शकता वाढेल, नियम न पाळणाऱ्या कर्मचाऱ्यांवर प्रभावी नियंत्रण येणार आहे.
नव्या निर्णयातील तरतुदी…
नव्या शासन निर्णयानुसार प्रत्येक अधिकारी व कर्मचारी यांनी कार्यालयात प्रवेश करताना तसेच कार्यालयात असताना ओळखपत्र दर्शनी भागावर लावणे बंधनकारक असेल. नियमभंग केल्यास शिस्तभंगाची कारवाई केली जाईल. या नियमाची काटेकोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित कार्यालय प्रमुख आणि विभाग प्रमुख यांच्यावर सोपविण्यात आली आहे.