स्थानिक स्वराज्य निवडणुकींचे बिगूल वाजले; अजित पवार स्वतः ऐकून घेणार नागरिकांच्या तक्रारी (संग्रहित फोटो)
पुणे : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगूल वाजताच, सर्वच राजकीय पक्षांनी आता जनसंपर्क अधिक दांडगा करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट) चे प्रमुख व उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार शनिवारी हडपसर येथे स्वत: नागरिकांच्या तक्रारी ऐकूण घेणार आहेत. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीही उपस्थित राहणार आहेत.
हेदेखील वाचा : Lonavala Tiger Point : लोणावळ्यात पर्यटकांचा वाढणार जोर! ३३३ कोटींचा टायगर पॉईंट पर्यटन प्रकल्पासाठी अजित पवारांची बैठक
पुणेकरांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी ‘राष्ट्रवादी जनसुनावणी’ या नागरी संवाद उपक्रमाची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. हडपसर येथून या उपक्रमाची सुरुवात होणार असून, त्यानंतर टप्प्याटप्प्याने हा उपक्रम पुणे शहर, पिंपरी-चिंचवडसह राज्यातील अन्य भागांमध्ये राबविण्यात येणार आहे. पुणे महापालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची प्रारूप प्रभाग रचना तयार करताना भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला विश्वासात घेतले नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक आणि कार्यकर्ते नाराज झाले आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत पालिका निवडणुका स्वबळावर लढण्यासाठी तयारीला लागावे, असे सांगितले होते. त्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. त्यातूनच आगामी महापालिका निवडणुकीच्या तयारीसाठी राष्ट्रवादी जनसुनावणी मोहीम सुरू केली आहे. त्यातूनच १३ सप्टेंबर रोजी म्हणजे शनिवारी सकाळी ९ ते दुपारी २ यावेळेत हडपसर मतदारसंघात नेताजी सुभाषचंद्र कार्यालय येथे जनसुनावणी घेणार आहे.
प्रत्येक नागरिकाची समजून घेणार तक्रार
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतः प्रत्येक नागरिकाची तक्रार ऐकून घेणार आहेत. या तक्रारींचे विभागनिहाय वर्गीकरण केले जाणार आहे. तक्रारींवर वेळेवर कार्यवाही व्हावी, यासाठी काटेकोर फॉलोअप यंत्रणा सज्ज असणार आहे. प्रत्येक तीन दिवसांनी उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतः आलेल्या तक्रारींवर काय कार्यवाही झाली, याचा पाठपुरावा घेणार आहेत. या जनसुनावणीसाठी किऑस्क, व्हॉट्सॲप तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे.