‘शिवाजी महाराज नसते, तर माझं नाव कलीमुद्दीन असतं’; भाजपच्या बड्या नेत्याचं विधान
छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती देशभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. दरम्यान मध्य प्रदेशात जंयती साजरी करत असताना राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते कैलाश विजयवर्गीय यांनी केलेले एक विधान सध्या देशभरात चर्चेत आहे. “आज हिंदू धर्म अबाधित आहे, माझे नाव कैलाश आहे, त्याचे एकमेव कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी पूर्ण माळवा, छत्तीसगडमध्ये मुघलांना घुसू दिलं नाही. नाहीतर माझं नावही कैलाशच्या ऐवजी कलीमुद्दीन असतं”, असं विधान केलं आहे. इंदूर येथे मराठी संघटनांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. कैलाश विजयवर्गीय भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस राहिलेले आहेत.
ते पुढे म्हटले की, छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदू धर्माची रक्षा करण्यासाठी सेना उभी केली. त्यांच्या मुठभर सैनिकांनी लाखोंच्या सेनेला पराभूत केलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी सनातन धर्माची रक्षा केली. म्हणूनच या प्रांतात मुघलांचा शिरकाव झाला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन झाल्यानंतर ब्रिटिश भारतात आले. महाराज असताना त्यांना भारतात येता आलं नाही. हिंदू समाज शिवाजी महाराजांचा कृतज्ञ आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
कैलाश विजयवर्गीय हे भाजपाचे वरिष्ठ नेते आहेत. त्यांनी केलेली विधाने मध्य प्रदेशसह ते बाहेरच्या राज्यांमध्येही प्रसिद्ध आहेत. पश्चिम बंगालमधील भाजपाचे प्रभारी पद त्यांनी अनेक वर्ष सांभाळले होते. नगरसेवक पदापासून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर ते खासदार ते राष्ट्रीय सरचिटणीस पदापर्यंत पोहोचले. त्यांना मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाचे दावेदारही मानलं जात होतं.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त राहुल गांधी यांनी केलेल्या ट्विटवरून राजकीय वाद पेटला आहे. सत्ताधारी विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. सत्ताधारी भाजपने राहुल गांधींच्या ट्विटनंतर काँग्रेसवर टीका केली. त्यानंतर आता कॉंग्रेसनेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधी यांना जयंतीदिनी श्रद्धांजली वाहिल्याची पोस्ट समोर आणली आहे.
सत्ताधाऱ्यांच्या टीकेनंतर काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले, ‘राहुल गांधी यांच्या ट्विटवरून भाजपने टीका करणे, त्यांचा हा दुटप्पीपणा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही जयंतीच्या दिवशी श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांच्या अधिकृत ट्विटरमध्ये तसा उल्लेख आहे. त्यामुळे ते फक्त राहुल गांधी यांची बदनामी भाजप करत आहेत’. काँग्रेसने पलटवार केल्यानंतर भाजपकडून काय प्रत्युत्तर दिलं जाणार, याची प्रतिक्षा आहे.