IIT च्या धर्तीवर मुंबईत IICT उभारणार; केंद्र सरकार करणार 400 कोटींची गुंतवणूक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
देशातील प्रतिष्ठित शिक्षण संस्थांपैकी एक असलेल्या आयआयटीच्या धर्तीवर ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी’ (IICT) मुंबईतील गोरेगाव येथे उभारण्यात येणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून ४०० कोटी रुपयांची आर्थिक मदत मिळणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
भारताच्या माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राला जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी ‘जागतिक दृक-श्राव्य मनोरंजन शिखर परिषद’ (World Audio-Visual & Entertainment Summit – Waves 2025) चे आयोजन करण्यात आले. या ऐतिहासिक परिषदेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी IICT प्रकल्पाची घोषणा केली. महाराष्ट्राला या परिषदेचे यजमानपद मिळाले असून, ही राज्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.
नौदलात नोकरीच्या नावाखाली १५ जणांची फसवणूक, मुंबई पोलिसांनी एका महिलेसह चार आरोपींना अटक
ही परिषद १ ते ४ मे २०२५ दरम्यान मुंबईतील जिओ कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित करण्यात येणार आहे. या शिखर परिषदेच्या पहिल्या सत्रात केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव, राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विचार मांडले.
IICT ही संस्था केवळ चित्रपट निर्मितीपुरती मर्यादित राहणार नाही, तर डिजिटल कंटेंट, VFX, अॅनिमेशन, ऑडिओ-व्हिज्युअल स्टोरीटेलिंग, मीडिया इनोव्हेशन आणि वेब 3.0 तंत्रज्ञान यांसारख्या क्षेत्रांत संशोधन व प्रशिक्षण प्रदान करेल. IIT बॉम्बेप्रमाणेच ही संस्था क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी क्षेत्रासाठी सर्वोत्तम शिक्षण आणि संशोधन केंद्र बनेल.
महाराष्ट्र शासनाने गोरेगाव फिल्मसिटीमध्ये IICT साठी जागा निश्चित केली आहे. हे केंद्र नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाच्या मदतीने भारताला जागतिक पातळीवर नेईल. हा प्रकल्प केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित राहणार नाही, तर संपूर्ण भारताच्या क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी क्षेत्राला चालना देणारा महत्त्वाचा टप्पा ठरेल.
बॉलिवूड आणि मनोरंजन उद्योगाचे महत्त्वपूर्ण केंद्र असलेल्या मुंबईत IICT उभारल्याने भारताच्या क्रिएटिव्ह इंडस्ट्रीला जागतिक स्तरावर स्वतःची ओळख निर्माण करण्याची संधी मिळेल. जसे दावोस आर्थिक क्षेत्रासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ आहे, तसेच मुंबई आता क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी क्षेत्रासाठी जागतिक ब्रँड म्हणून नावारूपाला येईल.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मते, “IICT केवळ एक शिक्षण संस्था नसून, संपूर्ण क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी उद्योगाला नवीन दिशा देणारे केंद्र बनेल. या संस्थेच्या माध्यमातून मुंबईला जागतिक क्रिएटिव्ह हब बनवण्याचा मानस आहे.”
भारतीय आयआयटी जगात अव्वल; ‘क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग’मध्ये धनबाद ‘टॉप’ला
या परिषदेदरम्यान, केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालय आणि महाराष्ट्र शासनादरम्यान ‘वेव्हज २०२५’ निमित्त सामंजस्य करार करण्यात आला. संजय जाजु यांनी या सत्राचे प्रास्ताविक केले, तर केंद्रीय राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी आभार मानले.
मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे आणि उद्योग विभागाचे प्रधान सचिव एल. अन्बलगन यांचीही या परिषदेत उपस्थिती होती.
IICT प्रकल्पामुळे महाराष्ट्र आणि भारताच्या क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी क्षेत्राला नवी दिशा मिळेल आणि देशाच्या माध्यम व मनोरंजन उद्योगाला जागतिक स्तरावर नेण्यास मदत होईल.