पुणे/Maharashtra weather Update: गेले काही दिवस राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक जिल्ह्यांत जोरदार सरी कोसळत आहेत. काल आणि आज पुणे जिल्ह्यात पावसाने थोडीशी उसंत घेतल्याचे दिसून आले. मात्र हवामान विभागाने राज्याला पावसाचा इशारा दिला आहे, त्याबाबत अधिक जाणून घेऊयात.
भारतीय हवामान विभागाने राज्याला पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र या भागात जोरदार पाऊस होणार आहे. हवामान विभागाने महाराष्ट्रातील विदर्भ, कोकण किनारपट्टी, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र या भागातील जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. उत्तर महाराष्ट्र, ठाणे, मुंबई, परभणी आणि नांदेड जिल्ह्यात वरुणराजा जोरात बॅटिंग करण्याची शक्यता आहे.
मराठवाडा विभागात अतिवृष्टी
मान्सूनने संपूर्ण राज्याला व्यापले आहे. गेल्या एका दिवसांत मराठवाड्यातील अनेक महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. छत्रपती संभाजीनगर, नांदेड, हिंगोली जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. आज आणि पुढील काही दिवस राज्याला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, कोल्हापूर आणि अन्य काही जिल्ह्यात पावसाचा जोर वाढत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत राज्यात सर्वत्रच मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
देशातील अनेक राज्यात पावसाचा इशारा
हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली गुजरात या राज्यांमध्ये मुसळधार पाऊस होत आहे. काही ठिकाणी पाणी साचल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
राज्यात कालपासून आज २६ जून रोजी सकाळपर्यंत झालेल्या पावसाची सरासरी आकडेवारी पुढीलप्रमाणे (सर्व आकडे मिलिमीटरमध्ये) :- ठाणे ५.७, रायगड ६.८, रत्नागिरी १०.७, सिंधुदुर्ग १६.६, पालघर ५, नाशिक ११.४, धुळे ७.२, नंदुरबार ११.७, जळगाव १०.२, अहिल्यानगर ०.२, पुणे ३.३, सोलापूर ०.९, सातारा २.३, सांगली १.९, कोल्हापूर १५.१, छत्रपती संभाजीनगर २६.२, जालना २४.१, बीड १.२, लातूर ४.१, धाराशिव ०.३, नांदेड ६०.३, हिंगोली ४७.१, बुलढाणा ३५.४, अकोला २०.९, वाशिम ८८.५, अमरावती ९.८, यवतमाळ ७०.३, वर्धा १९.७, नागपूर ३०.८, भंडारा १३.८, गोंदिया ५.८, चंद्रपूर १५.१ आणि गडचिरोली जिल्ह्यात ९.६ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
मुंबई उपनगर जिल्ह्यात झाड पडून दोन व्यक्ती जखमी झाल्या आहेत. पाण्यात बुडून कोल्हापूर जिल्ह्यात एका व्यक्तीचा मृत्यू , रत्नागिरी जिल्ह्यात पुराच्या पाण्यात वाहून एक व्यक्तीचा मृत्यू, सातारा जिल्ह्यात नदीत पडून एका व्यक्तीचा मृत्यू, यवतमाळ जिल्ह्यात पाण्यात बुडून एक व्यक्तीचा मृत्यू आणि पाण्यात वाहून गेल्याने नाशिक जिल्ह्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.