डेप्युटी सीईओ स्मिता पाटील चौकशीच्या कचाट्यात
सोलापूर: आरोग्य विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये तोंडी दिलेल्या आदेशाचा इफेक्ट सोलापूर झेडपीत दिसून आला पण विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी काढलेल्या परिपत्रकाला केराची टोपली दाखविण्यात आल्याची चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये रंगली आहे.
तुकाराम मुंढे यांनी आरोग्य विभागाचे आयुक्त म्हणून पदभार घेतल्यानंतर राज्यातील आरोग्य अधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी मुख्यालयात प्रतिनियुक्तीवर असलेला एकही कर्मचारी राहणार नाही असे आदेश दिले होते. या आदेशाची आरोग्य विभागाने तात्काळ अंमलबजावणी केली आहे. कोरोना महामारीच्या काळातही जिल्हा परिषदेत ठाण मांडून बसलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या नियुक्तीच्या ठिकाणी पाठविण्यात आले आहे. पण या आधीच विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी मुख्यालयात ठाण मांडून असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ नियुक्तीच्या ठिकाणी पाठवावे असे परिपत्रक प्रशासन विभागाला पाठविले आहे. प्रशासन विभागाने सर्व विभाग प्रमुखांकडून प्रतिनियुक्तीवरील कर्मचाऱ्यांची माहिती घेतली, पण या कर्मचाऱ्यांना मूळ नियुक्तीच्या ठिकाणी पाठविण्याची कार्यवाही अजून केलेली नाही. त्यामुळे मुंढे यांचा इफेक्ट झाला, विभागीय आयुक्त राव यांचा इफेक्ट कधी होणार?अशी चर्चा आता कर्मचाऱ्यात रंगली आहे. प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना 25 हजाराची लाच घेताना रंगेहात पकडल्यानंतर झेडपीतील वातावरण कलुषित झाले आहे. राज्यभर झेडपीची बदनामी झाली आहे. विशेष धक्कादायक बाब म्हणजे यापूर्वी लाच घेताना रंगेहात पकडलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा मुख्यालयात महत्त्वाचे टेबल देण्यात आले आहे. त्यामुळे अशा सर्व कर्मचाऱ्यांना साईड पोस्टिंगला ठेवण्यात यावे अशी मागणी जोर धरली आहे.
आरोग्य विभागात धुसफूस…
आयुक्त मुंढे यांच्या आदेशान्वये प्रतिनियुक्तीवरील सर्व कर्मचाऱ्यांना मूळ ठिकाणी सोडण्यात आले आहे. पण सीईओ यांच्या मर्जीतील कर्मचारी हजेरी मुख्यालयात काम दुसऱ्याच ठिकाणी करीत असल्याचे दिसून येत आहे. काहीजण चांगले काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांबाबत निनावी तक्रारी करीत असल्याचे दिसून आले आहे.