Mumbai Politics: राजधानी मुंबईत पुन्हा एकदा मराठी विरूद्ध अमराठी असा वाद उफाळला आहे. मनसेच्या आंदोलनामुळे यात मोठी ठिणगीच पडली आहे.अशातच मुंबईत पुन्हा एकदा परप्रांतीय व्यक्तीकडून मराठी माणसाला हिंदी किंवा भोजपुरी बोलण्याची सक्ती करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. स्थानिक मराठी व्यक्तीन मराठीत संवाद साधल्याने संबंधित परप्रांतीय व्यक्तीने आक्रमक होत त्याला हिंदी किंवा भोजपुरीत बोलण्यास जबरदस्ती केल्याची माहिती समोर आली आहे.
हा प्रकार समोर आल्याने मराठी समाजात पुन्हा एकदा संतापाची भावना व्यक्त केली जात आहे. मराठीचा अपमान सहन केला जाणार नाही, अशी प्रतिक्रीय अनेक नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही इतर मराठी स्थानिकांनी या प्रकरणी तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. हा प्रकार नेमका कुठे घडला, संबंधित व्यक्ती कोण होती, पोलिसांनी याप्रकरणी कोणती कारवाई केली, याबाबत अधिक माहिती अद्याप समोर आलेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, विरारमध्ये स्थानिक मराठी तरुण आणि एक परप्रांतीय रिक्षाचालकात मराठी बोलण्यावरून वाद झाला. रिक्षाचालकाने थेट दमदाटी करत संबंधित तरुणाला हिंदी किंवा भोजपुरीतच बोलण्याची सक्ती केली. विरार स्टेशन परिसरात हा प्रकार घडला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. व्हिडिओत मुजोर रिक्षाचालक स्थानिक तरुणाशी उद्धटपणे वागताना, मराठीची गळचेपी करत असल्याचे स्पष्टपणे दिसते. या प्रकारामुळे मराठी जनतेमध्ये संतापाची लाट उसळली असून, समाजमाध्यमांवर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
मुंबईत आधीच मराठी विरुद्ध हिंदी वादाचे वातावरण तापलेले असताना, विरारमधील हा प्रकार मराठी अस्मितेला थेट आव्हान देणारा आहे. मराठी माणसालाच महाराष्ट्रात त्याची भाषा बोलण्यासाठी स्पष्टीकरण द्यावे लागते, ही बाब धक्कादायक असल्याचे अनेकांनी म्हटले आहे. या प्रकरणी अद्याप अधिकृत कारवाई झाली नसल्याचे सांगितले जात आहे. स्थानिक प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
‘काकांनी तर ऐश्वर्या रायला टक्कर दिली’ ; कजरारे गाण्यावर जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले
दरम्यान, मीरा-भाईंदरमध्ये आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आयोजित मराठी मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कठोर भूमिका घेतली आहे. मोर्चापूर्वीच ठाणे-पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांना पहाटे तीनच्या सुमारास पोलिसांनी ताब्यात घेतले. सध्या त्यांना काशिमिरा पोलिस ठाण्यात ठेवण्यात आले आहे. मराठी बांधवांनी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन जाधव यांनी यापूर्वी केले होते. त्यानंतर पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली होती.
या कारवाईनंतर आता मनसेचे नेते आणि माजी आमदार राजू पाटील, तसेच नेते संदीप देशपांडे यांनाही मीरा-भाईंदरमध्ये येण्यास बंदी घालण्यात आली आहे. पोलिसांनी या दोघांनाही अधिकृत नोटीस बजावली असून, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ही पावले उचलण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.