राजापूर जवाहर चौकातील अस्ताव्यस्त वाहतुक त्यातच तीन रिक्षा स्टॅंड असताना इतरत्र थांबणारे रिक्षा व्यावसायिक यामुळे शहरातील वाहतुक व्यवस्थेचे चांगलेच धिंदवडे निघाले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या ठिकाणी असणारे वाहतुक पोलीस हा वाहतुक कोंडीचा खेळ रस्त्यालगतच्या एका दुकानात बसुन बघत असल्याने सर्वसामान्य जनतेतुन संताप व्यक्त करण्यात येत आहे.
सध्या दिवसेंदिवस राजापूर शहरातील वाहतुक व्यवस्था चांगलीच विस्कळीत झाली आहे. शहरात कर्तव्यावर असणारे वाहतुक पोलीस नाममात्र असल्याची टिका सर्वसामान्य जनतेतुन करण्यात येत आहे. राजापूर शहरात येणारा तालिमखाना ते जवाहर चौक हा एकमेव मार्ग असुन यावर सातत्याने वाहनांची वर्दळ असते. त्यातच राजापूर हायस्कुल ते जवाहर चौक या भागातील रस्ता अरुंद असुन याच भागात सुपर बझार जवळ माल वाहतुक करणारे ट्रक चालक कशाही गाड्या लावत असल्याने या वाहतुक कोंडीत आणखीनच भर पडत आहे.
तर जवाहर चौकात ३०० मिटरच्या परिघात एकुण तीन रिक्षा स्टॅंड असताना देखील व्यावसायाच्या हव्यासापोटी काही रिक्षाचालक एस टी पिक आप शेड येथे आपल्या रिक्षा उभ्या करत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. मात्र याठिकाणी कर्तव्यावर असणारे पोलीस ही सगळी वाहतुक कोंडी चौकातल्या एका दुधाच्या दुकानात खुर्च्यावर बसुन बघत असल्याने नेमके यांचे काम काय असा सवाल सर्वसामान्य जनता विचारत आहे.
सातत्याने ही होणारी वाहतुक कोंडी, अस्ताव्यस्त लावली जाणारी वाहने आणि काही रिक्षाचालकांची मनमानी यामुळे याठिकाणी किरकोळ अपघात झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. यापुर्वी एका दुकानाच्या बोर्डला तर एका कारला एस टीने ठोकर दिल्याची घटनाही घडली आहे. काही रिक्षा व्यावसायिक ज्या ठिकाणी एस टी वळते त्याच ठिकाणी आपली रिक्षा लावून व्यवसाय करत असल्याने अपघाताला आमंत्रण ठरत आहे. सातत्याने खुर्चीत बसुन मोबाइल पाहत असणाऱ्या वाहतुक पोलिसांनी असा अपघात घडल्यानंतर कारवाइचे फार्स करण्याऐवजी अपघात होऊ नयेत यासाठी वाहतुकीची व्यवस्थेकडे लक्ष द्यायची गरज आहे. मात्र वाहतुक पोलीस मात्र हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवुन कर्तव्य बजावत असल्याने सर्वसामान्य जनतेतुन संताप व्यक्त करण्यात येत आहे.