शिराळा : चांदोली धरणाच्या (Chandoli Dam) पाणलोट क्षेत्रात सोमवारपासून अतिवृष्टी कायम असून, धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. संभाव्य परिस्थिती आणि वार्षिक पाणी व्यवस्थापन नियमानुसार धरणाचे वीज निर्मिती केंद्र सुरू करण्यात आल्याची माहिती या विभागाकडून देण्यात आली.
सध्या धरण ६४ टक्के भरले असून, धरणात जवळपास १३ हजार क्यूसेकने पाण्याची आवक सुरू आहे. वीजनिर्मिती सुरू झाल्यामुळे तिथून नदीपात्रात ५०० क्युसेकचा विसर्ग होत आहे. तर नदीपत्रात एकूण ९०० क्युसेकचा विसर्ग होत आहे. त्यामुळे वारणा नदी अजूनही पात्राबाहेरच आहे. नदी लगत असलेल्या शेतात पाणी शिरले आहे. वाकुर्डे बुद्रुक येथील करमजाई तलाव १०० टक्के भरला असून, सांडव्यातून पाणी बाहेर पडले आहे.
आता काही दिवस तालुक्यातील मोरणा व गिरजवडे मध्यम प्रकल्प भरण्याची प्रतिक्षा करावी लागणार आहे. तालुक्यात इतर ठिकाणी ही दमदार पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी, नागरिक यांच्यात समाधानाचे वातावरण आहे. नदी नाले तसेच पाझर तलाव, व लघु पाटबंधारे धरणामध्ये पाणीसाठा वाढण्यास सुरुवात झाली आहे. कोकरूड रेठरे बंधारा अजूनही पाण्याखाली आहे.