
Ink thrown at Baramati Municipal Council President Sachin Satav by VBA supporters
बारामती नगरपरिषदेचे नगराध्यक्ष सचिन सातव यांच्यावर शाईफेक झाल्याची माहिती समोर आली आहे. सुपा येथे सचिन सातव यांच्या अंगावर शाई फेकण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी ही शाईफेक केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे बारामतीत राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. प्रजासत्ताक दिनी नगर पालिकेतील एका कार्यक्रमात झालेल्या चुकीमुळे ही वंचितच्या कार्यकर्तांकडून ही शाईफेक करण्यात आल्याचे बोलले जात आहे.
हे देखील वाचा : राहुल गांधींकडून राष्ट्रपतींचा अपमान? अनेकदा सांगूनही आसामचा पटाका घालण्याची झिडकारली विनंती
देशाचा 77 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला. प्रशासकीय कामकाजाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी आणि राजकीय नेत्यांनी ध्वजारोहण केले. या कार्यक्रमांमध्ये बारामतीमध्ये मोठी चूक झाल्याचे समोर आले. बारामती नगर परिषदेतही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र काल प्रजासत्ताक दिनी नगरपालिकेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो न लावल्यामुळे वंचितचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. या नाराज झालेल्या आक्रमक कार्यकर्त्यांनी बारामती तालुक्यातील सुपे येथे नगराध्यक्ष सचिन सातव यांच्यावर शाईफेक केली. यानंतर या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी देखील केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
हे देखील वाचा : पुण्यात आणखी एक वैष्णवी हगवणे? रुपाली चाकणकरांनी घेतली पीडित महिलेच्या कुटुंबियांची भेट
गिरीश महाजन यांनी उल्लेख न केल्याने वाद
नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या शासकीय कार्यक्रमात भाषण करताना पालकमंत्री गिरीश महाजन यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेतल्यामुळे वाद निर्माण झाला. या कार्यक्रमाच्या बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या एका महिला वनअधिकाऱ्याने उघडपणे आक्षेप घेतला. गिरीश महाजनांनी भाषणादरम्यान इतर अनेक नेत्यांची नावे घेतली, पण संविधान निर्मात्याचे नाव कसे विसरले असा जाब त्यांनी थेटपणे विचारला. यामुळे काही वेळासाठी कार्यक्रमाच्या ठिकाणी चांगला गोंधळ उडाला होता. निलंबित झाले तरी चालेल असा आक्रमक पवित्रा वनअधिकाऱ्याने घेतला. प्रजासत्ताक दिनाच्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेतल्यामुळे निर्माण झालेल्या वादावर मंत्री गिरीश महाजन यांनी आपली सविस्तर भूमिका मांडली आहे. “मी बाबासाहेबांच्या विचारांचा पाईक असून, केवळ अनवधानाने नाव घ्यायचे राहून गेले असेल, तर त्यावर एवढा गदारोळ कशासाठी?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.