मुंबई : मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील चतुरस्थ अभिनेता विक्रम गोखले यांचे आज सकाळी दीर्घ आजाराने निधन झाले. विक्रम गोखले यांच्या निधनाने सर्वस्थरातून दुःख व्यक्त होत आहे. अशातच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विक्रम गोखले यांचे जाणे चटका लावणारे आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
उद्धव ठाकरे म्हणाले, “विक्रम गोखले गेले. विश्वास बसत नाही. काल परवापर्यंत ते तसे संपर्कात होते. अनेक विषयांवर त्यांची मते ठाम होती. एक कसदार राजबिंडा अभिनेते म्हणून चित्रपट रंगभूमी त्यांनी गाजवली. स्पष्ट संवादफेक हे त्यांचे वैशिष्ट्य होते. हिंदी सिनेसृष्टीतील तो लोकप्रिय मराठी चेहरा होता. विक्रम गोखले यांचे जाणे चटका लावणारे आहे. मृत्यूवर मात करुन ते परत येतील असे वाटत होते. पण दुर्दैव. मी या महान अभिनेत्याला आदरांजली अर्पण करतो.” अशी भावना उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.