Sanjay Raut letter to Amit Shah:
Sanjay Raut letter to Amit Shah: देशाचे माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी काही दिवसांपूर्वी अचानक राजीनामा दिला. पण राजीनाम्यानंतर जगदीप धनखड अचानक गायब म्हणजेच दिसेनासे झाल्याने राजकीय वर्तुळा तर्कवितर्क काढले जाऊ लागले. यावरून थेट मोदी सरकारला घेरण्यासाठी विरोधकांनी आपली चाल खेळण्यास सुरूवात केली आहे. जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) यांनी राजीनामा दिल्यानंतर ते एकाएकी कुठे गायब झाले, ते कुठे आहेत, त्यांची प्रकृती ठिक आहे ना, असे प्रश्न इंडिया आघाडीच्या नेत्यांकडून उपस्थित केले जात आहेत.
तर याच मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना पत्र लिहून धनखड यांच्याबाबत विचारणा केली आहे. संजय राऊत यांनी त्यांच्या पत्रात माजी उपराष्ट्रपती धनखड यांच्या आरोग्याबद्दल आणि सुरक्षिततेबद्दल चिंता व्यक्त केली आहे, याशिवाय जगदीप धनखड यांच्या सुरक्षितता आणि आरोग्याच माहिती तातडीने देण्यात यावी, अशीही मागणी या पत्रातून केली आहे.
खासदार संजय राऊत यांनी अमित शाहांना लिहलेल्या पत्रात म्हटले आहे की, “मी आपल्याला हे पत्र अत्यंत गंभीर आणि चिंतेने लिहित आहे. गेल्या काही दिवसांपासून माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या सुरक्षिततेबद्दल आणि आरोग्याबद्दल अनेक उलटसुलट अफवा परसवल्या जात आहेत. त्यामुळे आम्ही सर्वजण त्यांच्या प्रकृतीबाबत खूप चिंतेत आहोत. २१ जुलै रोजी जगदीप धनखड यांनी राज्यसभेचे कामकाज सुरू असताना अचानक थांबवले. राज्यसभेच्या सभापतींची प्रकृती अस्वास्थाचे कारण देण्यात आले. ही घटना सामान्य असली तरी काही गोष्टी धक्कादायक आणि चिंताजनक आहेत.” असे संजय राऊत यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
राऊत यांनी आपल्या पत्रात असेही म्हटले आहे की, “दिल्लीत अशा अफवा सुरू आहेत की, जगदीप धनखड यांना त्यांच्या निवासस्थानीच नजरकैदेत ठेवण्यात आले आहे आणि ते सुरक्षित नाहीत. ही बाब अत्यंत चिंताजनक आहे.” त्यांनी सर्वोच्च न्यायालयात ‘हेबिअस कॉर्पस’ याचिका दाखल करण्याचा विचार असल्याचे नमूद केले. त्याआधी गृहमंत्र्यांकडून थेट माहिती घेणे योग्य वाटल्याचे स्पष्ट केले आहे. उपराष्ट्रपतींच्या सध्याच्या स्थितीबद्दल आणि सुरक्षिततेबद्दल योग्य माहिती मिळावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.
संजय राऊत यांनी यापूर्वीही धनखडांच्या अनुपस्थितीबाबत प्रश्न उपस्थित केले होते. “विरोधकांना गायब करण्याची परंपरा चीन आणि रशियात आहे, तीच पद्धत आता भारतात दिसत आहे,” असा आरोप त्यांनी केला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देताना ‘लापता लेडीज’ सिनेमाची आठवण करून दिली. दरम्यान, राजस्थानमध्ये धनखड यांच्या समर्थनार्थ बोलणाऱ्या भाजप प्रवक्त्याला पक्षाने सहा वर्षांसाठी निलंबित केले आहे. हा मुद्दा पकडत राऊत यांनी पुन्हा एकदा अमित शाहांना पत्र लिहून माजी उपराष्ट्रपतींच्या आरोग्य व ठिकाणाविषयी स्पष्ट माहिती देण्याची मागणी केली आहे.