
नरेश म्हस्केंचा संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल...
राज्यातील पूरग्रस्त भागातील मदतकार्याबद्दल बोलताना नरेश म्हस्के म्हणाले की, आमचे सरकार प्रत्यक्ष मदतकार्य करत आहे. लोकांचे अन्नधान्य, कपडे-लत्ते वाहून गेले आहेत, त्यांना या वस्तूंची गरज आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक मदतवाहने या गावांमध्ये पोहोचली आहेत. ठाण्यातूनही आम्ही आणखी गाड्यांचे नियोजन करत आहोत. संजय राऊत आणि ठाकरे गट फक्त बडबड करत आहेत, तर आम्ही प्रत्यक्षात लोकांना मदत करत आहोत.
उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना म्हस्के म्हणाले, “मी उद्धव ठाकरेंना म्हटले होते की, तुम्ही बांधावर जाताना पाच रुपयाचा बिस्किटाचा पुडा तरी घेऊन जा. पण ते पाच रुपयाचा बिस्किटाचा पुडा देखील घेऊन जाऊ शकले नाहीत.” तसेच, ठाकरे गट ही ‘देना बँक’ नसून ‘लेना बँक’ (घेणारी बँक) आहे, अशी टीकाही त्यांनी केली. शिवसेनेला सत्तेत आणण्यात मराठवाडा आणि कोकणने मोठा वाटा उचलला आहे, असे सांगत राऊतांनी आम्हाला शहाणपणा शिकवू नये, असे म्हस्के म्हणाले. बाळासाहेब ठाकरेंवर खालच्या भाषेत टीका करणाऱ्या लोकांची भाषणे तुम्ही दसरा मेळाव्यात ठेवता, हे निर्लज्जपणाचे लक्षण आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
खासदार म्हस्के यांनी राहुल गांधी यांच्यावरही जोरदार हल्लाबोल केला. “राहुल गांधी पाकिस्तानच्या प्रवक्त्याप्रमाणे भाषा करत आहेत,” असे ते म्हणाले. भारतीय सैन्याच्या कामगिरीवर राजकारणासाठी अविश्वास दाखवण्याची काँग्रेसची ही पहिली वेळ नाही. यापूर्वीही त्यांनी असेच केले आहे. पाकिस्तानची भूमिका राजकारणासाठी वापरत राहुल गांधी प्रवक्त्याच काम करत आहेत, असा आरोपही म्हस्केंनी केला. “त्यांच्या जोडीला ‘गांजा राऊत’ म्हणजेच संजय राऊतसुद्धा आहेत,” असा टोलाही त्यांनी लगावला.
राज ठाकरे यांच्यासोबत युती होणार असल्याच्या बातम्यांबद्दल विचारले असता, नरेश म्हस्के यांनी त्या फेटाळून लावल्या. उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्याला बहुदा गर्दी होत नसेल, म्हणून अशा प्रकारच्या बातम्या पसरवल्या जात आहेत, असे त्यांनी सांगितले.