इस्लामपूर / विनोद मोहिते : आमच्या भागात झाडे कमी असली तरी माकडांचा भरपूर त्रास होतोय. माकडांचा काहीतरी बंदोबस्त करा. माझ्या कौलारू घराला एकही कौल शिल्लक नाही, अशी तक्रार विदर्भातील एका शेतकऱ्यांनी केली. तेव्हा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी मिश्किलपणे उत्तर दिले. ‘त्या’ माकडांचा काय बंदोबस्त करणार? आता आपण हनुमान चालिसा म्हणतोय असे सांगत लहानपणीचा रामटेकमधील किस्सा ऐकवला.
तुम्ही अशी जिद्द ठेवा..शेतीत नवे प्रयोग करा. उत्पन्न मिळवा आणि कौले काढून काँक्रीटचा बंगला बांधा, असा सल्ला ही या शेती अभ्यास दौऱ्यावर आलेल्या शेतकऱ्याला दिला.
इस्लामपुरात राजारामबापू पाटील कारखाना कार्यस्थळावर विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूरच्या गोसीखुर्द राष्ट्रीय सिंचन प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या अभ्यास दौऱ्यादरम्यान जलसंपदामंत्री जयंत पाटील शेतकऱ्यांची संवाद साधत होते. त्या दरम्यान हा किस्सा घडला.
एका शेतकऱ्याने आमच्या भागात झाडे कमी असली तरी माकडांचा भरपूर त्रास होतो. माकडांचा बंदोबस्त करायला हवा. असे सांगत माकडांच्या उपद्रवामुळे येणाऱ्या अडचणीबाबत व्यथा मांडली. तेव्हा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी आपली लहानपणीची आठवण सांगितली. मी छोटा असताना रामटेकला एका मंदिरात आलो होतो. तेव्हा माझ्या हातातील केळी हिसकावून घेऊन माकडांनी खाल्या होत्या. तेव्हा मी प्रचंड घाबरलो होतो.
आता चाळीस-पन्नास वर्षांनंतर माकडे अधिक आक्रमक झाले असतील. माकडांचा बंदोबस्त आपण काय करणार ? आता तर आपण हनुमान चालिसी वाचतोय, असे म्हणताच उपस्थित शेतकऱ्यांमध्ये एकच हशा पिकला.
नागपूर, चंद्रपूर, भंडारा जिल्ह्यातील २५० हून अधिक शेतकरी वाळवा तालुक्यातील शेतीतील विविध प्रयोगशीलता पाहणार आहेत. सकाळच्या सत्रात मंत्री जयंत पाटील यांनी त्यांच्याशी संवाद साधला.