कोल्हापूर: महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांपैकी पन्हाळगड हा पहिला शिवकालीन पुनर्निर्मित किल्ला ठरेल. तसेच, जागतिक वारसा स्थळ म्हणूनही तो आपली वेगळी ओळख निर्माण करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. यासाठी आवश्यक असलेला निधी कमी पडू दिला जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा किल्ल्यावर त्यांच्या हस्ते 13-डी थिएटरचे लोकार्पण तसेच ‘पन्हाळगडाचा रणसंग्राम’ या लघुपटाच्या अनावरण सोहळ्यात ते बोलत होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पन्हाळगडावरील 13-डी शोच्या उद्घाटनाच्या प्रसंगी गौरवोद्गार काढले. त्यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच आपण येथे आहोत आणि आजही ते आपले आराध्य दैवत आहेत. हिंदवी स्वराज्य उभारण्यात पन्हाळगडाचे महत्त्व वेगळे असून, 13-डी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हा ऐतिहासिक वारसा नव्या पद्धतीने अनुभवता येणार आहे. विशेषतः, युद्धभूमीवर असल्याचा थरारक अनुभव प्रेक्षकांना मिळेल.
Maharashtra Politics : धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर मंत्रिपदासाठी आता ‘या’ नावांवर जोरदार चर्चा
शिवकालीन इतिहास हा केवळ वाचनापुरता मर्यादित न राहता तो अनुभवण्यासाठीही आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. या प्रकल्पामागील तज्ज्ञांचे आभार मानताना, आमदार विनय कोरे यांच्या योगदानाचे विशेष कौतुक करत “मी त्यांना सॅल्यूट करतो,” असे गौरवोद्गारही काढले. स्वराज्याच्या उपराजधानीत येऊन हा सिनेमा पाहण्याचे आवाहनही त्यांनी उपस्थितांना केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत आमदार विनय कोरे यांनी शिलाहार राजवटीच्या काळातील सोन्याची मुद्रा भेट देऊन केले. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी १३-डी थिएटर आणि परिसराचे कौतुक केले आणि “सर्व विधानसभा सदस्यांना येथे भेट देण्यासाठी आणू,” असे सांगितले.
आमदार विनय कोरे यांनी प्रस्ताविक भाषणात पन्हाळा किल्ल्याच्या ऐतिहासिक महत्त्वावर प्रकाश टाकला. तसेच, पन्हाळगडाच्या पुनर्निर्माणासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या पुढाकाराबद्दल त्यांचे आभार मानले. कार्यक्रमात विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांचा राष्ट्रपती पदक मिळाल्याबद्दल सन्मान करण्यात आला, तर माजी नगराध्यक्षा रुपाली धडेल यांनी आभार मानले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते “पन्हाळगडाचा रणसंग्राम” लघुपट आणि १३-डी थिएटरचे पन्हाळगड येथे कोनशिला अनावरण व फीत कापून लोकार्पण करण्यात आले. यानंतर त्यांनी थिएटरमधील शिवकालीन शस्त्रे, मुद्रा, नाणी आणि शिवरायांच्या वेशभूषेची पाहणी करून त्यासंबंधी माहिती जाणून घेतली.
त्यानंतर त्यांनी पन्हाळगडाच्या इतिहासावर आधारित चित्रफीत पाहिली आणि “पन्हाळगडाचा रणसंग्राम” हा लघुपटही अनुभवला. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना या निमित्ताने चांदीची तलवार भेट देण्यात आली.